Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case: बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी (दि. २३ सप्टेंबर) पोलीस चकमकीत मृत्यू झाला. मुंब्रा बाह्यवळण मार्गाजवळ पोलीस वाहनातच गोळाबाराच्या घटनेत अक्षय शिंदे ठार झाला. या चकमकीनंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला, तर विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवर आणि सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आता शिवसेना उबाठा गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ एक्सवर पोस्ट करून घटनेच्या आधी अक्षय शिंदेंची परिस्थिती कशी होती? हे दाखवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी अक्षय शिंदेचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिसांनी त्याचे हात बांधलेले आणि तोंडावर काळे फडके बांधलेले दिसत आहे. “अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होतेतेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे – फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।”, असे कॅप्शन लिहून संजय राऊत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हे वाचा >> Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह?

दरम्यान विरोधकांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले, “बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती. परंतू या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरीत करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे. भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय, असे भासते. या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तूस्थिती समोर येणं अपेक्षित आहे.”

तर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात उशीर करण्यात आला. लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफ आय आर दाखल करण्यात आली खरी पण आता आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. कायदा सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्थेची ही शासन पुरस्कृत थट्टा आहे.”

दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे (Asim Sarode) यांनीही पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. साधरणत: पोलिसांची बंदूक लॉक असते, मग आरोपी अक्षय शिंदेंनी बंदुकीचा लॉक तोडून पोलिसांवर फायरींग केली का, असा सवालही सरोदे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा >> “अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, कारण…”; आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?

अक्षय शिंदेच्या वडिलांचा पोलिसांवर गंभीर आरोप (फोटो-TIEPL)

शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी एक्सवर पोस्ट टाकली आहे. त्या म्हणाल्या, “अक्षय शिंदे हा महात्मा महापुरुष किंवा सोज्वळ माणूस नव्हता त्यामुळे त्याच्या मृत्यूवर हळहळण्यात काहीच अर्थ नाही. मात्र त्याच्या एन्काऊंटरच्या निमित्ताने कायद्याची संपूर्ण प्रक्रियाच बायपास करण्याचा जो प्रयत्न झाला त्यातून अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात त्याची उत्तरे कोण देणार?”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur sexual assault shiv sena ubt leader sanjay raut post accused akshay shinde video just before police encounter kvg