Rahul Gandhi on Badlapur KG Girl Sexual Abuse: काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज बदलापूरच्या घटनेचा हवाला देऊन महिला आणि मुलींच्या विरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात टीका केली आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पीडितांना न्याय देण्यापेक्षाही गुन्हा लपविण्याचे यंत्रणेने प्रयत्न केले. बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मंगळवारी (दि. २० ऑगस्ट) बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन झाले. ज्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे वळले.
बदलापूरमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाल्यानंतर पीडितेचे कुटुंबिय पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी गेले. मात्र त्यांना १२ तास ताटकळत बसावे लागले होते. एफआयआर दाखल करायला इतका वेळ घेतल्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर चहुबाजूंनी टीका झाली. विरोधकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर टीका करताना महायुती सरकारलाही लक्ष्य केले.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये याच मुद्द्याचा उल्लेख केला आहे. आता एफआयआर दाखल करण्यासाठीही लोकांना आंदोलन करावे लागणार आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
“बदलापूरमध्ये लहान मुलींवर अत्याचार झाल्यानंतर सर्वात आधी त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र लोक रस्त्यावर उतरेपर्यंत ही भूमिका घेतली गेली नाही. आता एफआयआर दाखल करण्यासाठीही लोकांनी रस्त्यावर उतरावे का? पीडितांना आता पोलीस ठाण्यात जाणेही कठीण का होऊन बसले आहे?”, असे प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत.
न्याय देण्यापेक्षा गुन्हा लपविण्यासाठीच अधिक प्रयत्न केले जातात. याचा फटका महिला आणि उपेक्षित घटकांतील लोकांना जास्त बसत आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. एफआयआर दाखल न करून घेतल्यामुळे पीडितांचे खच्चीकरण तर होतेच, पण आरोपीचे बळ वाढते, असेही ते म्हणाले.