वाई : काशीनाथाच चांगभलं च्या जयघोषात बावधनचे ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक आज हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात व शांततेत पार पडली. बावधन गावाच्या पूर्वेस कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाडयाकडून देवदेवतांची विधीवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाडयास पारंपारिक पोशाख घालून बगाडाच्या झोपाळयावर चढविण्यात आले. यावेळी भाविकांनी नोटांची व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले.
बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला दगडी चाकांचा रथ. या रथावर सुमारे तीस-चाळीस फुटाच्या उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साहय्याने बगाड्यास चढविण्यात येते. एका वेळी बारा बैल जोडयांच्या साहाय्याने हा रथ ओढण्यात येत होता. ठराविक अंतरावर बैल बदलण्यात येत होते. त्यासाठी पंधराशे बैल शिवारातून उभे दिसत होते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ, आणि ज्योतिवाची पालखी सुशोभित करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते.
आणखी वाचा-“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
यावर्षी शेलारवाडी येथील विकास तानाजी नवले हे बागाड्याचे मानकरी होते. ठीक ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. यावेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या. ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन बगाडाचे दर्शन घेतले. यात्रा नियोजन समितीचे सदस्य बगाडाच्या पुढे व मागे ध्वनीक्षेपकावरून मार्गदर्शन व सूचना करीत होते. भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यक्ती व सामाजिक संस्थांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. दुपारी साडेचार वाजता बगाड, वाई- सातारा रस्त्यावर आले. यावेळी काही काळ वाहतूक बंद करण्यात आली.
सायंकाळी सहा वाजता बगाड गावात मंदिराजवळ पोहचले. यावेळी वाद्यांचा गजर करण्यात आला. बगाड मिरवणूक पाहण्यास व सहभागी होण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते यात्रेसाठी पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब भालचीम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बिपिन चव्हाण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. बगाड मिरवणूक शांततेत पार पडली.