तालुक्यातील बहिरोबावाडी येथील सरपंच व उपसरपंचासह ग्रामपंचायतीचे पूर्ण लोकनियुक्त मंडळच बरखास्त करण्यात आले. सरपंच व उपसरपंचासह सर्वांनीच निवडणूक खर्च मुदतीत सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. शिवाय या सर्वांना पुढच्या पाच वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे.
कारवाईने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याबाबत नितीन ईश्वर तोरडमल यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार दाखल केली होती. बहिरोबावाडी ही ९ सदस्यांची समूह ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन सुमारे तीन वर्षे झाली आहेत. मात्र सरपंच ज्योती लष्कर व उपसरपंच मोठा पठाडे यांच्यासह अन्य सात सदस्यांनी या काळात निवडणूक खर्चच सादर केला नाही.
तोरडमल यांच्या तक्रारअर्जावर सुनावणी होऊन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी शुक्रवारी निकाल देताना सर्वच सदस्यांना अपात्र ठरवून ही ग्रामपंचायतच बरखास्त केली. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १२ ब मधील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार सरपंच व उपसरपंचासह महादेव तांदळे, लक्ष्मी तांदळे, रामेश्वर तोरडमल, सिंधू लाळगे, अनुराधा तोरडमल, भाऊसाहेब तोरडमल, रोहिणी पठाडे यांचे ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द झाले आहे. पुढील पाच वर्षांसाठी वरील सर्वांना कोणतीही निवडणूक लढवण्यासही अपात्र ठरविण्यात येत आहे. या निर्णयामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेतील तक्रारदार नितीन तोरडमल यांच्या पत्नीचे सदस्यत्व देखील या आदेशान रद्द झाले आहे. तोरडमल यांच्या वतीने वकील नामदेव खरात यांनी काम पाहिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा