महापालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील प्रमुख संशयित आ. सुरेश जैन यांचा जामीन अर्ज बुधवार सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला. न्या. अल्तमश कबीर, न्या. चलमेश्वर आणि न्या. विक्रमजी सेन यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर जैन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात त्रयस्थ अर्जदार म्हणून नगरसेवक नरेंद्र पाटील यांनीही अर्ज दाखल केला होता.
घरकुल प्रकरणात या गुन्ह्याची दखल जिल्हा न्यायालयात घेतली गेली आहे. संशयित जैन यांचा जामीन अर्ज ३० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळून लावला आहे, त्या निकालात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर आणि दोषारोप निश्चित झाल्यानंतर जामीन अर्ज पुन्हा करता येईल, असे न्यायालयाने म्हटले होते.
मात्र सुरेश जैन हे दोषारोष निश्चितीसाठी जळगावात येतच नाहीत, संशयित जैन हे घरकुल खटला चालविण्यासाठी कोणतेच सहकार्य करीत नाहीत. तसेच बऱ्याच दिवसापासून तथाकथित वैद्यकीय कारणावरून मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालययात दाखल आहेत, ते श्रीमंत, प्रभावशाली, राजकारणी आहेत. त्यामुळे घरकुल घोटाळ्याची न्यायालयाने दखल घेतली असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीतच ठेवणे योग्य आहे, त्यांच्या अर्जामुळे न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया गेला आहे, त्यांना जामीन मंजुरीची गरज नाही, असे मुद्दे यावेळी मांडण्यात आले.
त्यासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अ. र. अंतुले, यांच्या खटल्यांची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली.
या सर्वाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जैन यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला.

Story img Loader