सोलापूर महानगरपालिकेतील निलंबित नगर अभियंता सुभाष सावस्कर यांना महापालिकेतील महत्त्वाच्या कागदपत्रांची फायली जाणीवपूर्वक गहाळ केल्याच्या गुन्ह्य़ात मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
नगर  अभियंता सावस्कर हे पालिकेत कार्यरत असताना त्यांच्या दालनातील महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या पाच फायली त्यांनी जाणीवपूर्वक गहाळ केल्याचा ठपका पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ठेवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली आहे. सदर बझार पोलीस ठाण्यात सावस्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले आहे. या    गुन्ह्य़ात अटक टाळण्यासाठी सावस्कर यांनी यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता तो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता न्या. मृदुला भाटकर यांच्यासमोर सुनावणी झाली.  यात दोन्ही बाजूंचे म्हणणे विचारात घेऊन न्यायालयाने सावस्कर यांना दर सोमवारी व गुरुवारी सदर बझार पोलीस ठाण्यात हजेरी देण्याच्या व गुन्ह्य़ाच्या तपासाकामी पोलीस यंत्रणेला सहकार्य करयाच्या अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या प्रकरणी सावस्कर यांच्यातर्फे अॅड. शशी पुरवंत (मुंबई), अॅड. शशी कुलकर्णी व अॅड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले, तर सरकारची बाजू अॅड. पी. पी. शिंदे व सोलापूर पालिकेची बाजू अॅड. विजय किल्लेदार यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा