शहरातील वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूलमधील २९ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असणारा शिक्षक तात्याजी बंडू अहिरे याची शनिवारी न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.
डिसेंबर २०१२ पासून अहिरेकडून विद्यार्थिनींचा छळ केला जात होता. इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थिनींशी अश्लील संभाषण, पाठीवर थाप मारून लगट करीत असल्याची तक्रार वर्गशिक्षकांकडे आल्यानंतर त्यांनी ही बाब मुख्याध्यापकांकडे पोहोचविली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थाचालकांनी चौकशी करून अहिरेची निफाड येथे बदली केली. त्यानंतर पालक-शिक्षक संघाच्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार संस्थेने पोलीस व शिक्षण विभागासही अहवाल पाठविला. शिक्षकाच्या जाचाला कंटाळलेल्या काही विद्यार्थिनींनी पालकांनाही याबाबत माहिती दिली होती. या शिक्षकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्याची मागणी पालकांनी केल्यानंतर मुख्याध्यापकांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी तात्याजी अहिरेला अटक केली होती. शनिवारी त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर अहिरेच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.