Bajrang Dal on Aurangzeb Grave : “परकीय आक्रमकाचा वंशज असलेल्या औरंगजेबाने हिंदूंवर अत्याचाराचा कळस केला होता. जिहादी मानसिकतेच्या औरंगजेबाच्या कबरीचे राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांनी अस्तित्व ठेवू नये, अन्यथा प्रत्यक्ष ‘कारसेवा’ कृती करून ती कबर तिथून नष्ट करू”, असा इशारा बजरंग दलाने दिला आहे. ही कारसेवा आयोध्येतील ६ डिसेंबर १९९२ प्रमाणे असेल असेही बजरंग दलाने स्पष्ट केले. यावर आता वेगवेगळ्याराजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी देखील बजरंग दलाच्या इशाऱ्यावर भाष्य केलं आहे. देशमुख म्हणाले, “बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे.”
अनिल देशमुख काय म्हणाले?
अनिल देशमुख यांनी काही वेळापूर्वी पीटीआयशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर आहे, ती सरकारने हटवली नाही तर आम्ही कारसेवा करून ती हटवू. त्यांचं हे वक्तव्य खूपच दुर्दैवी आहे.”
देशमुख म्हणाले, “बाबरी मशिदीची जखम अजून ताजी असताना कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत आहेत. मात्र, अशा प्रकारची वक्तव्ये करून सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम बजरंग दलाकडून केलं जात आहे. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी.”
बजरंग दलाचं म्हणणं काय?
बजरंग दलाच्या महाराष्ट्र-गोवा क्षेत्राचे संयोजक विवेक कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी सरकारला औरंगजेबाची कबर हटवण्याचा इशारा दिला आहे. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा सहमंत्री शरद नगरकर देखील यावेळी उपस्थित होते. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा पहिला टप्पा सोमवारी (दि. १७)छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी सुरू होईल असंही नगरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
बजरंग दलाने म्हटलं आहे की “आलमगीर या नावाने जिथे-जिथे औरंगजेबाचं उदातीकरण चालू आहे ती सर्व ठिकाणे राज्य सरकारने नष्ट करावीत, कोणत्याही परकीयाचे नामोनिशाण या स्वतंत्र भारतात असू नये. औरंगजेबाचे अहिल्यानगर शहरात निधन झाले. पुढे त्याचे अवयव छत्रपती संभाजीनगर शहरात पुरण्यात आले. तिथेच कबर खोदण्यात आली. आज त्याचे उदत्तीकरण चालू आहे. स्थानिक प्रजेला अत्यंत पीडा देणारा, अन्यायी, दुराचारी, राष्ट्राचा शत्रू असणाऱ्या औरंगजेबाची कबर अस्तित्वात असणे ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे.”