Bajrang Sonawane : विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं, तर या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या, मात्र, असं असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना संपर्क करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत खासदार बजरंग सोनावणे यांनी भूमिका मांडली. तसंच बीडच्या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीड प्रकरणावर काय म्हणाले बजरंग सोनावणे?

बीडमध्ये गुंडगिरीचं राज्य आहे. बीड जिल्ह्यात सरकारने लक्ष घातलं पाहिजे. तसंच आम्ही मोक्का लावणार, सामूहिक गुन्हेगारीवर कारवाई करणार असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी शब्द पाळला तर चांगलं होईल. दुसरं असं की राजीनामा देणार नाही असं कुणी म्हणत असेल तर मी त्यावर काही बोलणार नाही. मी पहिल्या क्षणापासून सांगतो आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आणि मास्टरमाईंडही पकडला गेला पाहिजे. या कटात जे जे सहभागी आहेत त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे. गुटखा माफिया, मटका माफिया, राख माफिया यांची दडपशाही मोडून काढली पाहिजे. बीडमध्ये गुंडगिरी, दादागिरी हे सगळं वाढलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन एक महिना पूर्ण झाला तरीही एक आरोपी फरार आहेत. काहींनी आरोपींना पळून जायला मदत केली असंही समजतं आहे. जे आरोपी पकडले आहेत त्यांना कुणी मदत केली? त्यांना सहआरोपी का करत नाही? असाही सवाल बजरंग सोनावणेंनी केला. बीडमधला हा एकच प्रकार समोर आला आहे, यापेक्षा भयंकर गोष्टी बीडमध्ये घडल्या आहेत असंही बजरंग सोनावणे म्हणाले.

संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या-सोनावणे

बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडा आणि फाशी द्या. मास्टरमाईंडला पकडा ही आमची मागणी आहे. बीडच्या सगळ्या जनतेची मागणी आहे. खंडणीपासून हे सुरुवात झाली आहे. सगळे आरोपी एकत्र केले पाहिजेत. आरोपींना शिक्षा झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे असंही बजरंग सोनावणे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आठही आमदार एकत्र

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आठच्या आठ खासदार आम्ही एकत्र आहोत. आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केलेला नाही. माध्यमांकडे ही बातमी कुठून आली हे माहीत नाही असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. मला कुणाचाही फोन आलेला नाही तसंच मला कुणी काही राजकीय दृष्ट्याही सांगितलेलं नाही. सभागृहात समोर भेट झाली तर ती गोष्ट वेगळी. तिथे तर भाजपाचेही लोक भेटतात असं बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे.

सुनील तटकरेंशी राजकीय चर्चा एकदाही नाही-सोनावणे

सुनील तटकरेंनी नमस्ते केलं होतं. आम्ही सभागृहात भेटलो होतो त्यावेळी नमस्कार केला. बाकी कुठलाही राजकीय संपर्क नाही असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे. शरद पवारांच्या पक्षातले आठच्या आठ खासदार एकत्र आहेत. आमच्यात कुठलाही बेबनाव किंवा वाद नाही. आम्हाला राजकीयदृष्ट्या कुणीही संपर्क केलेला नाही. माध्यमांनी हा विषय कुठून आणला ते मला माहीत नाही. मी हे सगळं अत्यंत जबाबदारीने सांगतो आहे. तसंच बीडच्या प्रकरणावरही बजरंग सोनावणेंनी भाष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang sonawane answer about ajit pawar ncp offer to sharad pawar ncp mps what did he say scj