Bajrang Sonawane : बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वेगवेगळ्या नेत्यांकडून दररोज नवे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच आता बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी एक आरोप केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मस्साजोग गावात आले होते तेव्हा त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एका गाडीत होता. बजरंग सोनावणे यांच्या या वक्तव्याचा रोख वाल्मिक कराड यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धागेदोरे हे धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बजरंग सोनावणे यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले बजरंग सोनावणे?
“अजित पवार जेव्हा मस्साजोगला आले तेव्हा त्यांच्या ताफ्यात जी गाडी होती, त्याच गाडीतून एक आरोपी पोलिस स्टेशनला पोहोचला. पुण्यात आरोपी ज्या घरात थांबला त्याचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणीही बजरंग सोनावणे यांनी केली. या सर्वाची चौकशी झाली पाहिजे. जो आरोपी शरण आला आहे त्याचा तपास सीआयडीने करावा. तीन गुन्ह्यांचा तपास एकत्र केल्याने निश्चितच काहीतरी समोर येईल. तपासातून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देणे, ही आमची जबाबदारी आहे, असंही बजरंग सोनावणे यांनी म्हटले.
हे पण वाचा- Bajrang Sonavane : वाल्मिक कराड शरण आल्यानंतर बजरंग सोनावणेंची पहिली प्रतिक्रिया, “सीआयडीने आता…”
संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या
बीडच्या मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. डिसेंबर महिन्यात ही घटना घडली. यानंतर या हत्याप्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा संशय ज्याच्यावर आहे तो वाल्मिक कराडही ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला. आता या वाल्मिक कराडबाबत नवे आरोप होताना दिसत आहेत. बजरंग सोनावणेंनी थेट नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा रोख हा वाल्मिक कराडकडेच आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय आहे. तसंच या प्रकरणाची माहिती त्यांना होती असा आरोप होतो आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. यासंदर्भात मुंडे यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “मी राजीनामा द्यावा तर का द्यावा? याचं काहीतरी कारण तर लागेल. या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे, ना माझा कुठलाही संबंध आहे. मात्र, उगचीच कोणाचातरी राजीनामा मागायचा?”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.