लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने चांगलं यश मिळवलं. महाविकास आघाडीला तब्बल ३० जागा जिंकण्यात यश आलं तर महायुतीला १७ जागा मिळाल्या. असं असलं तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांनाही पराभवाला सामोर जावं लागलं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा ६ हजार ५५३ मतांनी विजय झाला. या विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांचे आभार मानले होते. त्यावर धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया देत बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली होती. आता धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला बजरंग सोनवणे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.
बजरंग सोनवणे काय म्हणाले?
“पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी निवडणुकीमध्ये माझी लायकी काढली होती. तसेच माझी पात्रता काढली होती. आता ते माझी बुद्धी काढत आहेत. आता त्यांना कशी बुद्धी दाखवायला पाहिजे. जनतेनं त्यांना माझी पात्रता काय आहे, हे निवडणुकीत दाखवलं आहे. ठीक आहे, ज्यांच्या त्यांच्या बुद्धी प्रमाणे जे ते बोलत आहेत. मला वाटलं की त्यांचे आभार मानावे म्हणून मी मानले”, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.
हेही वाचा : अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
सोनवणे पुढे म्हणाले, “धनंजय मुंडे यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. आमचा राजकीय वाद नाही. विषय हा एका रणांगणाचा आहे. येथे दोघांनाही बॉलिंग आणि बॅटिंग करायची आहे. त्यामध्ये कोणाची तरी विकेट जाणार आहेच. आता त्यांची विकेट गेलेली आहे आणि विधानसभेला आणखी त्यांची विकेट जाणार आहे”, असा इशाराही खासदार बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. ते टिव्ही ९ मराठीशी बोलत होते.
बजरंग सोनवणेंच्या आभारावर धनंजय मुंडे काय म्हणाले?
बजरंग सोनवणे यांनी आपण धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे विशेष आभार मानतो, असं म्हटल्यामुळे त्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता धनंजय मुंडेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, “निवडून आलेल्या खासदारांनी माझे विशेष आभार माननं म्हणजे त्यांना संभ्रम निर्माण करण्याचा सल्ला कुणीतरी दिला आहे. अशा प्रकारचे आभार त्यांनी मानावेत आणि तेही माझे आणि सुरेश धस यांचे हे न पटणारं आहे. यामागे संभ्रम निर्माण करणं आणि त्यातून वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची यासंदर्भातलं विधान त्यांचं दिसतंय”,असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.