चिपळूण: कोकणात लोककलांची खाण आहे. याच कोकणातल्या लोककला नव्या पिढीपर्यंत किती पोहोचल्या आहेत, त्यांनी किती समजून घेतल्या आहेत, या प्रमुख उद्देशाने बाल रंगभूमी परिषद मुंबईच्यावतीने जल्लोष लोककलेचा हा लोककलांवर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात, त्यांनी त्या जपाव्यात, अशी या मागची भावना आहे, असे प्रतिपादन बालरंगभूमी परिषद मुंबईच्या अध्यक्षा, अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांनी केले.
चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस बालरंगभूमी परिषद मुंबईच्यावतीने व रत्नागिरी शाखेच्या संयोजनाने, नाट्य परिषद चिपळूणच्या सहकार्याने जल्लोष लोककला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून निलम शिर्के-सामंत यांच्या हस्ते या महोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले.
हेही वाचा >>>Ahilyanagar : अहमदनगर नव्हे अहिल्यानगर! महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी
रंगभूमी परिषद लहान मुलांना व्यासपीठ निर्माण करून देण्यासाठी काम करीत आहे. वेगवेगळ्या भागात लोककला महोत्सव होत आहेत. लहान मुले मोबाईलमध्ये अडकत चालली आहेत. त्यांना यातून बाहेर काढून लोककलांची जाणीव व्हावी, असा परिषदेचा उद्देश आहे. लवकरच रत्नागिरीमध्ये विशेष विद्यार्थ्यांसाठी कला महोत्सव होत आहे. यानंतर व्यावसायिक स्वरूपाची बालनाट्य स्पर्धाही होणार आहे. स्पर्धक म्हणून प्रेक्षक म्हणून जोडलेला प्रत्येक विद्यार्थी बालरंगभूमीचा सदस्य आहे, असे शिर्के-सामंत यांनी सांगितले.
तत्पूर्वी लोककलावंत योगेश बांडागळे, राजेश गोसावी, प्रकाश गांधी आदींनी नमनातील पहिलं नमन सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर योगेश बांडागळे यांनी आपल्या खास संगमेश्वरी बोलीत गाऱ्हाणे घातले आणि निलम शिर्के यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा >>>सावंतवाडी: शेतकरी व फळ बागायतदारांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडत शक्ती प्रदर्शन
अभिनेते नंदू जुवेकर यांनी लोककला महोत्सवाच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. लोकसंस्कृती, बोलीभाषा जपणाऱ्या लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचे संवर्धन व्हावे, त्यासाठी या महोत्सवासारखे उपक्रम आयोजित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दिंडीने या लोककला महोत्सवाचा सकाळी साडेआठ वाजता प्रारंभ झाला. चिपळूण नगर पालिका येथे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व या शोभा यात्रेला सुरुवात झाली. चिंचनाकामार्गे ही शोभायात्रा सांस्कृतिक केंद्र शेजारी अश्वारूढ पुतळ्याजवळ पोहोचली. नटराजाची मूर्ती असलेल्या पालखीला विशाल भोसले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी खांदा दिला. शहरातील विविध शाळा, विविध संस्थांचे प्रतिनिधीही यांनीही यामध्ये सहभाग नोंदवला.
उद्घाटन कार्यक्रमाला अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, ज्येष्ठ लोककलावंत दत्ताराम भोजने, वसई विरार महानगर पालिकेचे उपयुक्त प्रसाद शिंगटे, बालरंग भूमी शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष ओंकार रेडीज आदी उपस्थित होते
डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी कोकणातील लोककला हे इथल्या माणसाची जगण्याची एक शैली आहे. अनेक लोककला आज लुप्त पावत आहेत, त्या जपण्याची व त्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कोकणातील लोककला या इथली बोलीभाषा जपतात, इथली संस्कृती जपतात, मनोरंजनातून प्रबोधन करतात. इथल्या लोककला निसर्गाशी, माणसांशी आपले नाते सांगतात. कोकणातील संस्कृतीची ही जणू खाण आहे व ती जपण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ लोक कलावंत, शाहीर दत्ताराम भोजने यांनी लोककला महोत्सव आयोजन करून लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. परिषदेच्या अध्यक्षा निलम शिर्के-सामंत यांना धन्यवाद दिले. आज कोकणातल्या ग्रामीण भागात अनेक लोक कलावंत लोककला जपण्याचं काम करीत आहेत, ते दुर्लक्षित आहेत. अशा लोककलावंतांना पुढे आणण्याची गरज असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
बाल रंगभूमी परिषद रत्नागिरी शाखेच्यावतीने अध्यक्ष नंदू जुवेकर, कार्याध्यक्ष ओंकार रेडीज व त्यांच्या सहकाऱ्यांनी निलम शिर्के-सामंत यांचा सत्कार केला. नाट्य परिषद शाखा चिपळूणच्यावतीने अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, दिलीप भामरे डॉ. मिनल ओक, दिलीप आंब्रे, मंगेश बापट, प्रा. संगीता जोशी, छाया पोटे, सीमा रानडे, संजय कदम, प्राची जोशी, आदिती देशपांडे, वर्षा देशपांडे, विभावरी राजपूत आदींनी नीलम शिर्के-सामंत यांचे स्वागत केले.
या लोककला महोत्सवात सामूहिक व एकच अशा तब्बल ८२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. दोन दिवस हा लोककला महोत्सव चिपळूणमध्ये रंगणार आहे. शनिवारी या लोककला महोत्सवाचे सांगता होणार आहे. या वेळी आमदार शेखर निकम व अन्य मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. या महोत्सवाला जिल्ह्यातील शाळांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. नाट्य परिषद शाखा चिपळूण, बालरंग भूमी परिषद रत्नागिरीचे सर्व पदाधिकारी व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली खर्चे यांनी केले. यानंतर स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रकाश गांधी यांनी केले.