शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर येथील शिवसैनिकांनी गुरुवारी त्यांच्या चांदीच्या मूर्तीची हत्तीवरून मिरवणूक काढली. या वेळी गणपती आणि मीनाताई ठाकरे यांच्याही चांदीच्या मूर्ती समवेत होत्या. या सर्व मूर्तीची मुक्तांगण विभागातील शिवमंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, तीन दिवस हा प्रतिष्ठापना उत्सव सुरू राहणार आहे.
मुक्तांगण जिमखाना मित्र मंडळ आणि नगरसेवक प्रवीण नाईक यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिमखान्यापासून गुरुवारी सकाळी मिरवणुकीस सुरुवात झाली. चित्ररथात गणेशाची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली होती, तर सजविलेल्या हत्तीवर बाळासाहेब व मीनाताई यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. आयोजक प्रविण नाईक, खा. हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते. सनई चौघडा, अश्वावर स्वार युवती, उंट, झांजपथक, ढोलताशे, सर्वत्र भगवे ध्वज हातात घेऊन निघालेले पथक असे मिरवणुकीचे स्वरुप होते. मिरवणुकीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात येत होती. मिरवणूक मार्ग रांगोळयांनी सजविण्यात आला होता. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. शनिवारी पूर्णाहुती व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

Story img Loader