Bala Nandgaonkar On Avinash Jadhav : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तब्बल १२८ उमेदवार राज्यभरात विविध मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, १२८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला. या पराभवामध्ये मनसेचे नेते अविनाश जाधव यांचाही समावेश आहे.

आज १ डिसेंबर रोजी अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पण अविनाश जाधव यांनी अचानक जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच राजीनामा देताना अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं कारण त्यांनी दिलं. मात्र, यानंतर मनेसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही माध्यमांशी बोलताना अविनाश जाधव यांनी दिलेल्या राजीनाम्यासंदर्भात प्रतिक्रिया देत राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं आहे. “विधानसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला”, असं बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “जयंत पाटलांनी बालमित्र मंडळाचा करेक्ट कार्यक्रम केला”, रोहित पाटलांच्या मुख्य प्रतोद निवडीवरून अमोल मिटकरींची खोचक टीका

बाळा नांदगावकर काय म्हणाले?

“ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तो देखील एक कार्यकर्ता आहे. चांगला कार्यकर्ता असल्यामुळे त्यांच्या मनाला लागलं असेल. त्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. यावर राज ठाकरे योग्य तो विचार करतील. आमचा अविनाश लढवय्या आहे. लढवय्या वृत्तीच्या माणसाला पराभव झाला तर जिव्हारी लागतो. तसं या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला असेल” असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

अविनाश जाधव यांनी पत्रात काय म्हटलं?

“विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथील पराभवाची जबाबदारी घेऊन मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काम करताना माझ्याकडू कळत-नकळत काही चूक झाली असल्यास आपण माफ करावे”, असं अविनाश जाधव यांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचं जिल्हाध्यक्ष पद आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारांनी निवडणुका लढवल्या होत्या. अविनाश जाधव यांनी सुद्धा ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण त्यांचा या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला. या मतदारसंघात अविनाश जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर होते. ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या इतर उमेदवारांचाही पराभव झाला. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.