महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘नो टू हलाल’ मोहीम हाती घेतल्याची माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली होती. इस्लामिक पद्धतीने प्राण्याची होणारी कत्तल यावर आवाज उठवत मनसेकडून ही मोहीम सुरु करण्यात येणार होती. मात्र, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ‘नो टू हलाल’ मोहिमेबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नो टू हलाल’ ही मोहीम ‘ही मनसेची अधिकृत भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही मोहीम सुरु होण्यापूर्वीच बारगळ्याचे दिसून येत आहे.
हलाल अर्थव्यवस्थेतून जमा होणारा पैसा दहशतवादाच्या अंमलबजावणीसाठी वापरला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. त्यामुळे ‘नो टू हलाल’ या मोहिमेत सामील होण्याचे मनसेकडून आवाहनही करण्यात आले होते. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी, शनिवारी पत्रकार परिषद घेत हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र किल्लेदार यांनी ‘नो टु हलाल’ मोहिमेबाबत मांडलेली भूमिका अधिकृत नसल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले की, आमच्या एका कार्यकर्त्याने ती मागणी केली आहे, मात्र ती पक्षाची भूमिका नाही. ‘नो टू हलाल’ ही पक्षाची भूमिका नाही. जोपर्यंत पक्षप्रमुख एखादी मागणी करत नाही तोपर्यंत ती पक्षाची भूमिका होत नाही. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणे उचित नाही, असेही नांदगावकर म्हणाले