Bala Nandgaonkar: माहीमच्या जागेवर अमित ठाकरेंची उमेदवारी मनसेने सर्वात आधी जाहीर केली. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आणि त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने महेश सावंत यांना उमेदवारी दिली. एकनाथ शिंदे हे सदा सरवणकर यांची समजूत घालून त्यांची उमेदवारी मागे घ्यायला लावतील असं वाटलं होतं पण तसं घडलं नाही. तसंच मागच्यावेळी वरळीत आदित्य ठाकरे उभे असताना राज ठाकरेंनी उमेदवार दिला नव्हता. आता यावेळी उद्धव ठाकरेही अमित ठाकरेंच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत असं वाटलं होतं. पण तसं घडलं नाही. आता बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी उद्धव ठाकरेंना रक्ताचं नातं जपा असं आवाहन केलं आहे.
बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?
आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आम्हाला संघर्षाशी दोन हात कसे करायचे माहीत आहे. राज ठाकरे सभा लवकरच माझ्यासाठीही घेतील याचा मला विश्वास आहे असं बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी म्हटलं आहे.
कुटुंबावर अडचणी आल्या तेव्हा राज ठाकरेंनी राजकारण बाजूला ठेवलं
“राज ठाकरे अत्यंत स्पष्ट आणि सडेतोडपणे बोलतात. जे पोटात आहे तेच ओठात असं असणारा नेता आहे. बाळासाहेबांकडूनच त्यांच्याकडे हा गुण आला आहे. मनाने राजा असलेला माणूस आहे. बाळासाहेबांचं रक्ताचं नातं त्यांनी जपलं आहे. कुटुंबावर अडचणी आल्या त्यावेळी त्यांनी एक पाऊल पुढे टाकत त्यांनी सगळं राजकारण बाजूला ठेवलं आहे. राज ठाकरे संवेदनशील आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं मनही कोमल होतं. तसाच राज ठाकरेंचा स्वभाव आहे.” असं बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी म्हटलं आहे.
आदित्य विरोधात उमेदवार राज ठाकरेंनी दिला नव्हता-नांदगावकर
“आदित्य ठाकरे उभे होते तेव्हा उमेदवार द्यायचा नाही हे राज ठाकरेंनी मला स्पष्ट सांगितलं. आदित्य माझा पुतण्या आहे, ठाकरे घराण्यातला मुलगा पहिल्यांदा उभा राहिला आहे त्यामुळे २०१९ ला वरळीत उमेदवार द्यायचा नाही ही राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका होती. आम्ही तिथल्या मतांची पर्वा केली नाही. राजकारणाच्या पलिकडे कौटुंबिक नातं आहे ते जपायचं काम राज ठाकरेंनी केलं आहे.” असंही बाळा नांदवकर ( Bala Nandgaonkar ) यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- Sada Sarvankar : सदा सरवणकर यांचं वक्तव्य, “राज ठाकरेंच्या मनात काय ते मला..”
उद्धव ठाकरेंकडून अजूनही अपेक्षा आहे की…
मला उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा होती की ते माहीममधून उमेदवार द्यायला नको होता. पण शेवटी हे राजकारण दिलं आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेही उमेदवार दिला आहे. आता काय करणार? आम्हाला अपेक्षित नव्हती अशी अमितची उमेदवारी आली. त्यावेळी अमित ठाकरे म्हणाले की पक्षाने आदेश दिला तर मी कुठेही उभा राहिन असं ते बोलले. त्यानंतर भांडुपच्या लोकांनी सांगितलं. पण नंतर माहीम मतदारसंघ आला. कारण माहीम होम पीच आहे. आम्ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी नातं जपायला हवं. निवडणुका येतील आणि जातील. मात्र ज्या कुटुंबाने नाव दिलं, वैभव मिळालं. मान-सन्मान मिळाला आहे तो बाळासाहेबांमुळे झाला आहे. माझी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा विचार करायला हवा असं बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) म्हणाले.