शिवसेनेतील ४० आमदारांनी ८ महीन्यांपूर्वी बंडखोरी करत भाजपासोबत वेगळी चूल मांडली. एकनाथ शिंदे यांनी या ४० आमदारांना सोबत घेत भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली आहे. तेव्हापासून एकनाथ शिंदे गटातील नेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत आहेत. आज यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील उडी घेतली आहे. मनसे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी आज संजय राऊतांवर हल्लाबोल केला.
नांदगावकर म्हणाले की, “राज ठाकरेंनी संजय राऊतांना मोठं केलं, पण तो त्यांचाही नाही झाला, तो तुमचा काय होणार. या संजय राऊतांनी स्वतः कबुली दिलेली की, मी पवार साहेबांचा (राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार) माणूस आहे. आता त्यांनी पवारसाहेबांचा माणूस आहे असं सांगितलंय म्हटल्यावर पुढे काय होणार ते तुम्हाला माहितीच आहे.”
हे ही वाचा >> “…तेव्हा खूप वेदना होत होत्या”, शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
…तर नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले नसते
दरम्यान, बाळा नांदगावकर म्हणाले की, “राज ठाकरे यांच्याकडे शिवसेना या पक्षाची धुरा असती तर नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडले नसते, एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते, चाळीस आमदार बाहेर पडले नसते, शिवसेनेचे खासदार पक्षातून बाहेर पडले नसते. आत्ता तुम्ही लोकांकडे जाऊन मतांचा जोगवा मागत आहात. तुमच्याकडे तुमच्या कर्तृत्त्वावर उभं केलेलं काय आहे? असाही प्रश्न बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला.”