नागझिरा अभयारण्यालगतच्या रिसॉर्ट मालकाकडून वाघाचे कातडे जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्य़ातील दोघांना मध्यप्रदेशातील बालाघाट पोलिसांनी मध्यप्रदेशातील नैनपूर-धापेवाडा मार्गावर अटक केली. महाराष्ट्रातील वाघांच्या शिकारीचे सत्र संपले आहे, असे वाटत असतानाच एक एक प्रकरण पुन्हा उघडकीस येऊ लागल्याने वाघांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मध्यप्रदेशातील नैनपूर-धापेवाडा मार्गावर बालाघाट पोलिसांनी बॅरिअर लावले होते. एका दुसऱ्याच घटनेचा शोध घेण्यासाठी बालाघाटचे पोलिस उपअधीक्षक गौरव तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीरज सोनी आणि पोलिस निरीक्षक हरिप्रसाद टैकाम यांनी सापळा रचला. या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू असतानाच एमएच ३६/एच-२७४४ या क्रमांकाच्या मारुती अल्टो हे चारचाकी वाहन थांबवण्यात आले. यातून लाखनी येथील मधुकुमार मेघराजानी आणि साकोली येथील सुधाकर खाटवानी या दोघांकडे एका पूर्ण वाढ झालेल्या वाघाचे कातडे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार या कातडय़ाची किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. या दोघांनाही त्वरित अटक करून वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत कलम ९, ४९(बी) ५०, ५१ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोघेही जण मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहेत.
यासंदर्भात बालाघाटचे उपवनसंरक्षक अशोक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ही कारवाई बालाघाट पोलिसांची असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या हे प्रकरण बालाघाट पोलिसच हाताळत असून आरोपींना आज बालाघाटच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आल्यावर त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याचे चव्हाण म्हणाले. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील पिटेझरीच्या लाखनी फुड हाऊस रिसॉर्टचा मधुकुमार मेघराजानी हा मालक आहे. मेघराजानी आणि खातवानी यांनी ही शिकार नागझिरा व्याघ्र प्रकल्पातीलच असल्याचे सांगितले. नागपूरला हे वाघाचे कातडे विक्रीसाठी नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे  नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दहा वर्षांपूर्वी १५ वाघांचा संचार असलेल्या या व्याघ्रप्रकल्पात आता अवघे ६ वाघ उरले आहेत. ही विभागाची आकडेवारी असली तरीही प्रत्यक्षात तेवढेही वाघ आहेत किंवा नाही, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही शिकार नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील असल्याचे सिद्ध झाल्यास वाघांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.