तब्बल पाच दशकं आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रसार आणि प्रचाराचं कार्य करणारे आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. बालाजी तांबेंचं आयुर्वेदातील कार्य फक्त स्थानिक, राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न राहाता आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांच्या उपचारपद्धतींना मानणारा एक मोठा वर्ग होता. राजकारण ते समाजकारण आणि उद्योग जगत ते सिनेविश्व अशा सर्वच क्षेत्रांमध्ये बालाजी तांबे यांचा मित्र परिवार देखील होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी देखील बालाजी तांबेंचा गाढा स्नेह होता. एबीपी माझा वाहिनीला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयीची आपली एक आठवण देखील सांगितली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

MTDCचा बंगला आणि बाळासाहेबांकडे तक्रार

बालाजी तांबे त्या काळी एमटीडीसीच्या एका बंगल्यात भाड्याने राहात होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी बालाजी तांबेंच्या बंगल्यावर मुक्काम केला. यावेळी बालाजी तांबे यांनी केलेल्या तक्रारीनंतर चक्क बाळासाहेब ठाकरेंनी हातात काठी घेऊन सगळ्यांचीच शाळा घेतल्याची आठवण बालाजी तांबेंनी सांगितली होती.

बाळासाहेब ठाकरे बालाजी तांबेंच्या बंगल्यावर राहाण्यासाठी आले असताना त्यांना सगळीकडे अस्वच्छता दिसली. बंगल्याच्या आजूबाजूला कचरापट्टी झाली होती. याबाबत त्यांनी बालाजी तांबे यांना विचारणा केली होती. तेव्हा बालाजी तांबेंनी आपली तक्रार त्यांच्यापुढे मांडली. “मी त्यांना सगळं सांगितलं. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी आहे, आम्ही स्वच्छतेवरच सगळी लक्ष्मी कमावली आहे वगैरे. पण कुणी काही ऐकतच नाही”, असं बालाजी तांबेंनी बाळासाहेबांना सांगितलं.

बाळासाहेब ठाकरेंसोबत बालाजी तांबेंचं होतं अनोखं नातं (फोटो – बालाजी तांबेंच्या ट्विटरवरून साभार)

…आणि बाळासाहेबांनी सोडलं फर्मान!

बाळासाहेबांनी हे सगळं ऐकलं आणि तडक एक काठीच हातात घेतल आणि फर्मान सोडलं, “बोलवा रे त्या सगळ्यांना”. बाळासाहेबांचा हा पवित्रा पाहून बालाजी तांबेंनी विचारलं, “बाळासाहेब, तुमची युनियन आहे का इथे?” त्यावर बाळासाहेब उत्तरले, “माझं युनियन नाही. पण मी दाखवतो युनियनशिवाय कशी कामं होतात ते!”

बालाजी तांबे या मुलाखतीमध्ये म्हणतात, एवढं बोलून बाळासाहेबांनी तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांची झडती घ्यायला सुरुवात केली. त्यांना दरडावलं, की लगेच सगळीकडे स्वच्छता करा, रोपं लावा. मी जाईपर्यंत इथे सगळं हिरवं दिसलं नाही, तर या काठीने एकेकाला दाखवतो!

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात बालाजी तांबेंचा असा दिग्गज मित्र परिवार पाहायला मिळतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balaji tambe news died at the age of 81 friendship with balasaheb thackeray pmw