रुपेरी पडद्यावर  दिसणारी अभिनेता शक्ती कपूरची प्रतिमा मनात घोळवीत त्याच्या आगमनाकडे आतुरतेने वाट पाहणाऱ्यांची घोर निराशा त्याने तोडलेल्या अकलेच्या ताऱ्यांमुळे झाली. शिवाय त्यामुळे आयोजकांचेही धाबे दणाणले. अखेर ‘तोल’ गेलेल्या शक्ती कपूरचा वास्तववादी अभिनय बळजबरीने भाग पाडण्याची नामुष्की आयोजकांवर ओढवली. हा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा यात्रोत्सवात शनिवारी रात्री घडला.
दरवर्षी दत्त जयंतीपासून सारंगखेडय़ातील यात्रेस सुरुवात होते. यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी संयोजक दरवर्षी काही सिनेकलावंतांना आमंत्रित करीत असतात. यंदा ‘जल्लोष’ या कार्यक्रमासाठी शक्ती कपूरला आमंत्रित करण्यात आले होते. रात्री आठची वेळ असताना प्रत्यक्षात शक्ती कपूर कार्यक्रमस्थळी सव्वादहा वाजता पोहोचला. व्यासपीठावर पाऊल टाकताच त्याने उपस्थित मान्यवरांबद्दल अपशब्द वापरले. शक्ती कपूरची ही वेगळीच ‘डायलॉगबाजी’ ऐकून उपस्थित चाट पडले. ‘सब नेता चोर होते है. यहाँ के नेता चोर नही होंगे ऐसे मानता हूँ’ असे तो बरळू लागताच प्रेक्षक आणि आयोजकांनी त्याचा ‘तोल’ का सुटला, हे ओळखले. त्यामुळे आयोजकांनी प्रसंगावधान राखून कार्यक्रम आटोपता घेतला. अशा प्रकारे शक्ती कपूरचा शो पूर्णपणे फ्लॉप ठरला.
खरे तर दुसऱ्या दिवशी शक्ती कपूरच्या हस्ते अश्व शर्यतीतील विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार होती. मात्र त्याची अवस्था पाहून आयोजकांनी त्याला रात्रीच रवाना केले. तत्पूर्वी मध्यरात्री भूक लागल्याने शहादा येथील ज्या शाकाहारी हॉटेलमध्ये तो थांबला होता तिथे मांसाहाराची मागणी करू लागला. हॉटेल मालकाने नकार दिल्यावर त्याने तिथेही धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्याला शेव, भाजी व कांदा, एवढय़ावरच भागवावे लागले. पुन्हा जादा तमाशा नको म्हणून आयोजकांनी शिव्या हासडतच त्याला रात्री मुंबईकडे रवाना केले. यात्रोत्सवाप्रसंगी कोणत्या कलाकारांना आमंत्रित करायला हवे याचे भान भविष्यात आयोजकांनी ठेवणे योग्य, अशा तीव्र प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा