भारत छोडो आंदोलन व हैदराबाद मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. गंगाप्रसाद अग्रवाल यांना पद्मभूषण बाळासाहेब भारदे मानव उत्थान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. रविवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजता सरस्वती भुवनच्या मध्यवर्ती कार्यालय सभागृहात पुरस्कार वितरण होईल. २५ हजार रुपये रोख व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
विधानसभेचे अध्यक्षपद १० वर्षे कुशलतेने सांभाळणाऱ्या देशभक्त बाळासाहेब भारदे यांची जन्मशताब्दी २५ मे पासून साजरी होणार आहे. याचे औचित्य साधून भूदान व ग्रामदान चळवळीत जीवन समर्पित करणारे, शेकडो कार्यकर्ते घडविणारे गंगाप्रसाद अग्रवाल यांना हा पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यु. म. पठाण यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. मराठवाडय़ाचा विकास व्हावा, या साठी अग्रवाल यांनी आयुष्य वेचले. ९२ व्या वर्षीही ते मानव उत्थानासाठी कार्यरत आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन भारदे मानव उत्थान प्रतिष्ठानचे ज्ञानप्रकाश मोदाणी व शरदचंद्र बाकलीवाल यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा