आरक्षणासाठी महाराष्ट्रातला मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. एका बाजूला मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांचं आणि मराठा क्रांती मोर्चाचं शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे. दुसऱ्या बाजूला राज्यात ठिकठिकाणी आक्रमक आंदोलनं पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी आंदोलकांनी मराठा नेत्यांना लक्ष्य केलं आहे. आमदारांच्या गाड्या अडवणं, नेत्यांना घेराव घालण्यासारखे प्रकार पाहायला मिळत आहेत.
राज्यातल्या अनेक मराठा आमदारांना मतदारसंघांमधील नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं आहे. परिणामी मराठा आरक्षणासाठी आमदारांनी आंदोलन सुरू केलं आहे. अनेक मराठा आमदार मंगळवारपासून (३१ ऑक्टोबर) मंत्रालयाबाहेर आंदोलन करत आहेत. काल या आंदोलनात १० आमदार सहभागी झाले होते. आंदोलन करणाऱ्या आमदारांची संख्या आज २५ झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील आमदार बाळासाहेब आजबे हेदेखील कालपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी आंदोलन थांबवावं यासाठी राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी त्यांची समजूत काढली. परंतु, आजबे हे आंदोलनावर ठाम आहेत. आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले, मंत्र्यांनी सांगितलं किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तरी आमचं आंदोलन बंद होणार नाही. काल इथे आम्ही १० आमदार आंदोलन करत होतो, आज इथे २५ आमदार जमले आहेत. उद्या १०० आमदार आंदोलन करताना दिसतील. जे आमदार या आंदोलनात सामील होणार नाहीत ते मराठ्यांचे दोषी मानले जातील.
अजित पवार गटातील आमदार सुनील शेळकेदेखील आंदोलन करत आहेत. शेळके यांनी यावेळी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. ते म्हणाले, आम्ही ठरवून, योजना आखून इथे आंदोलनाला बसलो नाही. १० मिनिटांपूर्वी ठरवलं होतं की मंत्रालयाचं दार बंद करायचं. आम्ही त्यासाठी इथे आलो आहोत. मी राज्यातल्या सर्व आमदारांना विनंती करतो की, जोवर मराठा आरक्षणावर मार्ग निघत नाही, हा तिढा सुटत नाही तोवर सर्वांनी मुंबईत यावं आणि मंत्रालयाचं कामकाज बंद करायला भाग पाडावं. मी राज्यातल्या सर्व आमदारांना इथे येण्याचं आवाहन करतो.
हे ही वाचा >> “मी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो की, तुम्ही नेट बंद करून…”; मनोज जरांगेंचं वक्तव्य, म्हणाले…
दरम्यान, सत्ताधारी पक्षातील आमदार मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत हे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन केलं. तसेच राज्यपालांची भेट घेतली. याचा अर्थ काय होतो? सत्तेतील आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास नाही का?