Balasaheb Thackeray: शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) आज नाशिक येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत विविध नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. दरम्यान यावेळी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणही ऐकायला मिळाले. यामध्ये विशेष माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले.

तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो

बाळासाहेबांच्या आवाजातील भाषणाच्या सुरुवातील, “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो”, हे शब्द ऐकायला मिळाले. हे शब्द कानी पडताच उपस्थितांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. बाळासाहेबांच्या आवाजातील या भाषणातून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केल्याचे ऐकायला मिळाले.

“आज तुफान गर्दी दिसत आहे. अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच. नाशिक आणि शिवसेनेचे एक नाते आहेच. नरेंद्र मोदी म्हणतात तसे हे नाते नाही. नासिक से मेरा पुराना नाता हैं. मैं यहा वीर सावरकरजी के साथ काम करता था और जॅकसन के वध मैं मेरा ही प्लॅनिंग था. अरे जातील तिथे गंडवायचे आहे आणि लोकही गंडत आहेत”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले.

कमळाबाई म्हणजे एक ढोंग

बाळासाहेबांच्या आवाजातील भाषणात पुढे म्हटले की, “ही काही नाती जपणारी माणसे नाहीत. कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग. भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातच काय देशातही कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला. खांदा म्हणजे आधाराचा हो. अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवले. पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे. २५ वर्षे आमचे आमचे त्यांच्याशी एक नाते नक्कीच होते. महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले.”

वीर सावरकरांच्या मार्गाने जावेच लागेल

बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजातील भाषणात पुढे राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवरही भाष्य करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “भाजपा आणि नकली शिवसेनावाल्यांनी काय दिवे लावले. ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली. लोकशाहीत हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसेल काय. ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही. हे असेच सुरू राहणार असले तर स्वातंत्र्याचा रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या मार्गाने जावेच लागेल. होय, मी हे सावरकरांच्या नाशिकमध्ये बोलतो आहे.”

Live Updates