शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतील शनिवारी सायंकाळपासून व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेली दुकाने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. शहर व ग्रामीण भागातील काना-कोपऱ्यांतील सर्व दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. बाळासाहेबांना सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी फलक लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी आयोजित सभेत बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिवसेनेसह मनसेचे बहुतांश प्रमुख पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते बाळासाहेबांच्या अन्त्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी शनिवारी रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. बाळासाहेबांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर व्यापारी वर्गाने स्वत: पुढाकार घेत बंद केलेली दुकाने रविवारीही उघडली नाहीत. आरोग्यसेवा व बससेवा वगळता सर्वच काही बंद होते. रविवारी सायंकाळी मुंबईत बाळासाहेबांवर अंतिमसंस्कार होणार असल्याने व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने श्रद्धांजली वाहिली. बहुतांश दुकाने बंद झाल्याने प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता. क्वचित एखादे वाहन रस्त्याने जाताना दिसत होते. चौका-चौकात बंदोबस्त ठेवून पोलीस यंत्रणा स्थितीवर नजर ठेवून होती. चित्रपटगृहे, मॉल्सही पूर्णपणे बंद होती. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनीही आपापल्या घरावरील आकाशकंदील, दीपमाळा बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण केली. नाशिक शहरात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी फलक उभारून बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नाशिक शहर काँग्रेसतर्फे काँग्रेस कमिटीत आयोजित सभेत बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. धुळे, जळगाव व नंदुरबार शहरातील असेच चित्र पाहावयास मिळाले. मनमाड येथे एकात्मता चौकात सामुदायिकरीत्या श्रद्धांजली वाहण्यात आली. येवला येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. मंगळवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा होणार आहे.

Story img Loader