शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्य़ावरही शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनानंतर जिल्ह्य़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांनी बाळासाहेबांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
बाळासाहेबांच्या निधनानंतर आज दिवसभर जिल्ह्य़ात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. अलिबाग, महाड, पनवेल, रोहा, पेण, खोपोली, कर्जत या प्रमुख बाजारपेठा आज १०० टक्के बंद ठेवण्यात आल्या. जिल्ह्य़ातील विविध रिक्षा संघटनांनीही आज बंद पाळला. तर हॉटेल व्यवसायिकांनीही बंदमध्ये सहभाग घेतला. एसटी वाहतूक सेवा आणि औषधांच्या दुकानांना मात्र बंदमधून वगळण्यात आले होते. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्हय़ात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दरम्यान सर्वच राजकीय पक्षांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसेनेसह, भाजप, शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसनेही श्रद्धांजलीचे बॅनर शहरात लावले. एरवी गजबजलेल्या असणाऱ्या अलिबाग शहरात तर आज स्मशानशांतता पसरली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर जणू संपूर्ण शहरावर शोककळा पसरली होती. दिवाळीचा लखलखाट थंडावला होता. रस्ते ओस पडल्याचे दुर्मिळ चित्र पाहायला मिळत होते. दरम्यान हॉटेल व्यवसाय बंद असल्याने अलिबागला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे मात्र चांगलेच हाल झाले.
दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे. आचार्य अत्रे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या भवितव्यासाठी पुढाकार घेतला होता. मार्मिक या साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठी माणसाला एकत्र करून शिवसेनेच्या कार्याची ओळख करून दिली. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, कुणाची भीती न बाळगता वावरणे हे प्रेरणादायी होते.
रायगड जिल्ह्य़ात तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या अनावरण सोहळ्यासाठी त्यांना माझ्या वडिलांनी बोलवले होते. तेव्हापासून त्याचा आणि आमचा स्नेह होता. बाळासाहेबांच्या निधनामुळे मराठी माणसांच्या हृदयाला भिडणारा आणि त्यांच्यासाठी लढणारा नेता हरपला आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्य़ात कडकडीत बंद
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर रायगड जिल्ह्य़ावरही शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनानंतर जिल्ह्य़ात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वच राजकीय पक्षांनी बाळासाहेबांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.
First published on: 19-11-2012 at 02:38 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death following raigad district closed