शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी कळताच सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात  दुकाने बंद ठेवण्यात आली. सिंधुदुर्ग आणि मुंबईचे अतूट नाते शिवसेनाप्रमुखांमुळे बनले होते. राज्यात शिवसेना युतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांनी मालवणच्या आभार सभेत साष्टांग नमस्कार घालून नतमस्तक झाल्याची आठवण सर्वानीच काढली.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या अनेक चाकरमानी सुपुत्रांना शिवसेनाप्रमुखांच्या स्पर्शाने मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार, महापौर अशा अनेक पदांवर विराजमान होण्याचा मान मिळाला.शिवसेना व शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सुपुत्र आणि मुंबईकर चाकरमानी मंडळींनी अनेक सत्तास्थाने भोगली. आज वेगवेगळ्या पक्षांत शिवसेनाप्रमुखांचे अनुयायी असले तरी बाळासाहेबांबद्दलचा आदर त्यांच्या मनात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आणि मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर अशा विविध शहरांतील सुपुत्राला शिवसेनाप्रमुखांमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मान उंचाविणारी पदे मिळाली असल्याने जिल्ह्य़ात शिवसेनाप्रमुखांच्या निधनाने सर्वानीच हळहळ व्यक्त केली.
शिवसेनाप्रमुखांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दुकाने बंद केली. रविवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्य़ातील व्यापार क्षेत्रासह रिक्षा, टॅक्सी अशा सर्वानी बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले.
सिंधुदुर्गातील सारेच मुंबईच्या फोनवर अवलंबून होते. आज संध्याकाळी अनेक शिवसैनिक व शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने प्रेरित असलेले मान्यवर अंत्यदर्शनासाठी मुंबईकडे रवाना झाले. शिवसेनाप्रमुखांना रविवारी जिल्ह्य़ात अनेकांनी श्रद्धांजली वाहणारे विचार मांडले.

Story img Loader