सर्वसामान्यांकरीता लढणारा, कधीही जातपात न पाहता कार्यकर्त्यांस राजकारणातील सर्वोच्च पदांवर नेणारा, समाजकारण, धर्मकारण व राजकारण यांची गुंफण करणारा प्रभावी नेता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनामुळे गमावल्याची भावना नाशिकच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आ. बबन घोलप यांनी आपले सर्वस्व हरपल्याची भावना व्यक्त केली. आपल्यासारख्या छोटय़ा कार्यकर्त्यांला साहेबांमुळे मंत्रीपद मिळाले. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांच्या सानिध्यात राहण्यात आल्याने आपण स्वत:ला भाग्यवान समजतो. देव, देश आणि धर्म हा बाणा त्यांनी जोपासला. त्यासाठी यापुढे कार्यरत राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही घोलप यांनी म्हटले आहे.
खा. समीर भुजबळ यांनी बाळासाहेब हे माणूस म्हणून थोर होते. अखेपर्यंत त्यांच्याशी आमचे स्नेहपूर्वक संबंध होते, असे सांगितले त्यांची ठाकरी भाषा, विशिष्ठ वक्तृत्व त्वशैली लहानपणापासून अनुभवायस मिळाली. ते सांगतील, तीच पूर्वदिशा राहत असे, असे खा. भुजबळ यांनी म्हटले आहे.
मनसेचे आ. वसंत गिते यांनी शिवसेनाप्रमुखांनी काही आदेश दिला तर संपूर्ण जगाचे लक्ष महाराष्ट्राकडे लागायचे. सत्तेचा मोह त्यांनी कधीही धरला नाही. उलट, सर्वसामान्य कार्यकर्त्यांला सत्तेच्या मोठय़ा स्थानांपर्यंत नेऊन पोहोचविले. जगाच्या पाठीवर असा हा एकमेव नेता असल्याची भावना व्यक्त केली.
माजी महापौर दशरथ पाटील यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाने एक प्रभावी, अनुभवी आणि स्वत:करीता काही न मिळविणारा आणि लोकांकरिता लढणारे नेतृत्व गमावल्याचे दु:ख व्यक्त केले. गुरूची आठवण आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना कदापी विसरता येणार नाही. बाळासाहेबांसारखा प्रभावी अन् संघर्षमय नेता पहावयास मिळणे अवघड आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे आ. जयप्रकाश छाजेड यांनी आपली भावना व्यक्त करताना महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचा व संरक्षणाचा ध्यास घेतलेला हा नेता असल्याचे नमूद केले. त्यांचा पिंड व्यंगचित्रकार, पत्रकाराचा असल्याने समाज व राजकारणातील उणिवा ते मार्मिकपणे मांडत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जयंत जाधव यांनी समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण यांची सुंदर गुंफण घालणारा महान नेता आपण गमावल्याचे सांगितले. जे मनांत असेल तेच ओठावर आणणारा आणि तेच कृतीत उतरविणारा द्रष्टा नेता, सर्वसामान्यांना आपलासा करणारा हा नेता असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांनी बाळासाहेब हे आपले दैवत होते असे सांगून एका सामान्य शेतकऱ्याला खासदार बनविण्याची जादू केवळ त्यांच्यामध्येच होती, अशी भावना व्यक्त केली.
‘त्यांनी सर्वसामान्यांना प्रतिष्ठा दिली’
पुणे : शिवसेनाप्रमुखांनी आमचे अश्रू पुसले आणि आम्हाला लढायलाही शिकवले. सर्वसामान्य, फाटक्या कार्यकर्त्यांला, शेतकऱ्याला, अगदी कामगारालाही त्यांनी मान आणि प्रतिष्ठा मिळवून दिली, अशा शब्दात माजी मंत्री शशिकांत सुतार यांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. आमचे दैवत आज निघून गेले आहे. मराठी माणसाचा तारणहार आणि मराठी माणसासाठी लढणारा नेता हरपला आहे. बाळासाहेबांनी मराठी माणसाचे अश्रू पुसले आणि मराठी माणसाला लढायलाही शिकवले. त्यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. राजकीय हित आणि राष्ट्रहित असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा तेव्हा त्यांनी राष्ट्रहित पाहिले. मराठीची टिंगल करणाऱ्यांना त्यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले, असेही सुतार म्हणाले.