‘नाशिकच्या पवित्र भूमीत जाहीर सभेसाठी मी प्रथमच आलो आहे. नाशिकच्या तरुणांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर आता ही सभा आयोजित केली आहे. या तरुणांमधील उत्साह आणि येथे जमलेल्या तमाम मराठी बांधवांनी सभेला जो प्रतिसाद दिला, तो पाहून मी अक्षरश: थक्क झालो आहे. असाच प्रतिसाद मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेला यापुढेही द्यावा..’
शहराच्या भद्रकाली परिसरातील टांगा स्टँण्ड चौकात २६ एप्रिल १९६८ रोजी झालेल्या पहिल्याच जाहीर सभेत शिवसेनेचे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या या भावनिक आवाहनास नंतर नाशिककर जागले. पुढील काळात शिवसैनिकांनी जो प्रतिसाद दिला तो अवर्णनीय असाच. त्यामुळेच ठाणे, मुंबईनंतर नाशिक हे बाळासाहेबांचे आवडते ठिकाण बनले.
बाळासाहेबांच्या पहिल्याच सभेला काँग्रेसचा तीव्र विरोध होता. तेव्हा भद्रकाली परिसरात काँग्रेसचे आ. शांतारामबापू वावरे यांचा दबदबा होता. परंतु, हा विरोध झुगारून बाळासाहेब सभास्थानी दाखल झाले आणि उपरोक्त आवाहनाबरोबर तत्कालीन काँग्रेस सरकार, समाजवादी, कम्युनिष्टांवर त्यांनी खास ठाकरी शैलीत हल्लाबोल केला. या आठवणींचा पट उलगडला तो शहरात शिवसेनेची पहिली शाखा स्थापन करण्यात पुढाकार घेणारे तत्कालीन शाखाप्रमुख उत्तमराव तथा मामा तांबे यांच्यासह सर्पमित्र अण्णा लकडे यांनी. या सभेच्या नियोजनाची धुरा मामांनी सांभाळली होती, तर बाळासाहेबांच्या छटा टिपण्याची जबाबदारी अण्णांनी.
नाशिकमध्ये १९६७ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा हुंडीवाला लेनमध्ये स्थापन झाली. त्यावेळी काँग्रेसचे कार्यालयही याच परिसरात होते. प्रसिद्ध साहित्यिक विमादी पटवर्धन आणि बाळासाहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध. शिवसेनेची स्थापना होण्याआधीपासून बाळासाहेबांचे त्यांच्या उपनगर भागातील घरी जाणे-येणे होते. तेव्हा नाशिकमध्ये नव्याने स्थापन झालेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कारखान्यात दाक्षिणात्यांची भरती होत असल्याची माहिती बाळासाहेबांना मिळाली. त्यामुळे नाशिकमध्येही शिवसेनेची स्थापना झाली पाहिजे, अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यांची ही भावना लक्षात घेऊन पटवर्धनांनी आपणास बोलावून सरसेनापतींशी भेट घडविली. एचएएलसह सर्वच क्षेत्रात मराठी माणसाचे प्राबल्य असावे, हे बाळासाहेबांनी ठासून सांगितल्यानंतर पहिली शाखा उघडण्याची तयारी आम्ही सुरू केली. या अनुषंगाने बाळासाहेबांनी २०० ते २५० स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. त्यानंतर हुंडीवाला लेनमध्ये शहरातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मुंबईतील प्रमुख कार्यकर्ते आणि नाशिकचे भूमिपुत्र म्हणून छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी पोलीस शिवसैनिकांना प्रचंड त्रास देत. हे निदर्शनास आल्यावर बाळासाहेबांनी ‘कोणाला घाबरायचे नाही, शिवसेनेचे भवितव्य उज्ज्वल आहे’ असे सांगून लढण्यास बळ दिले. भद्रकालीतील पहिल्या सभेची कहाणी विलक्षणच. काही व्यापाऱ्यांनी त्याकरिता स्वत:हून देणगी दिली. काँग्रेसचा सभेला विरोध असला तरी पोलिसांनीे मात्र परवानगी दिली. पूर्वतयारीच्या कामांचे नियोजन या भागातील वास्तुविशारद शिवाजी रोकडे यांच्या कार्यालयातून होत असे. शहरवासीयांना सभेची माहिती देण्यासाठी खास गाडी फिरवून ग्रामोफोनद्वारे प्रचार करण्यात आला. शिवसैनिकांसाठी वाघाची छबी कागदावर असलेले बनियन तयार करण्यात आले. दामोदर चित्रपटगृहासमोरील रस्ते व परिसर पताका व झेंडय़ांनी भगवामय करण्यात आला. रमेश आर्टने व्यासपीठाची उभारणी केली. सभेच्या दिवशी गाडगेमहाराज पुतळ्यापासून बाळासाहेबांची मिरवणूक काढण्यात आली. चौकातील सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. कारण, तोपर्यंत बाळासाहेबांचे घणाघाती भाषण नाशिककर केवळ वर्तमानपत्रातून वाचत होते. सभेच्या निमित्ताने ते प्रत्यक्षात ऐकावयास मिळणार असल्याने नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. सभेला इतकी गर्दी होईल याची कल्पना खुद्द शिवसैनिकांनाही नव्हती. या सभेचे अध्यक्षपद प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अ. वा. वर्टी यांनी भूषविले. यावरून बाळासाहेबांचे शहरातील साहित्यिकांशी असणारे निकटचे संबंध अधोरेखित झाले.
पुढील काळात मालेगावमध्ये झालेल्या सभेचा अनुभव पूर्णत: वेगळा होता. बाळासाहेबांची आक्रमक व बेधडक शैली तेव्हा खऱ्या अर्थाने पाहावयास मिळाली. त्या सभेची तारीख व वेळ जाहीर करण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. ही बाब दूरध्वनीवरून कळविल्यानंतर बाळासाहेबांनी पोलीस परवानगी देवोत अगर न देवो, आपण जाहीर केलेली सभा होईलच, असा इशारा देत त्यांनी सभा घेतलीच, अशी आठवण तांबे यांनी नमूद केली.
नाशकात साजरा झालेला वाढदिवस
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नसल्याची बाब भगूर येथील भेटीत लक्षात आल्यावर खुद्द बाळासाहेबांनी शिवाजी महाराजांचा पुतळा खास मुंबईतून बनवून घेतला. अनावरण सोहळ्यासाठी जो दिवस निवडला गेला, तो सरसेनापतींच्या वाढदिवसाचा होता. २३ जानेवारी १९७० हा तो दिवस. पुतळा अनावरणासह त्या दिवशी चौक मंडई परिसरात जाहीर सभाही आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने बाळासाहेबांचा वाढदिवस नाशकात साजरा करण्याची संधी मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. बाळासाहेबांचे माप न घेताच ‘मिनिस्टर सूट’ शिवण्यात आला. या दिवशी तो भेट दिल्यावर बाळासाहेबांनी बिनमापाचा सूट चांगला झाल्याचे प्रशस्तिपत्रकही दिले. एवढेच नव्हे तर, मेनरोडवरील भगवंतराव हॉटेलमध्ये वाढदिवसानिमित्त खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मीनाताई ठाकरेही उपस्थित होत्या.
‘मार्मिक’ च्या कामातून नाशिककरांसाठी वेळ
मंगळवार हा दिवस साहेबांनी खास ‘मार्मिक’च्या कामासाठी राखून ठेवलेला होता. या दिवशी ते कोणालाही भेटत नसत. परंतु, त्यास नाशिकचे ज्येष्ठ शिवसैनिक अपवाद होते. या दिवशी ते ‘मार्मिक’मधील संपादकीय लेख व व्यंगचित्राचे काम करीत. मंगळवारीही मातोश्रीवर गेलो तरी बाळासाहेब आपल्याला वेळ देत असत, अशी आठवण मामा तांबे यांनी सांगितली. अतिशय आस्थेने साहेब जिल्ह्य़ातील परिस्थितीची चौकशी करून महत्त्वाच्या सूचना करत असत. मीनाताई या चहा, नाश्ता दिल्याशिवाय कधी जाऊ देत नसत. प्रबोधनकार ठाकरे (बाबा) यांची खोली दर्शनीच होती. ते देखील आस्थेने चौकशी करत. पत्र वाचून घेण्याबरोबर बाबा एखाद्या बातमीवर लाल पेनने निशाणी करण्यास सांगत. याविषयी विचारले असता बाबा सांगत, ‘हे तुझ्या बाळासाहेबांसाठी’ यावरून ते व्यंगचित्र व संपादकीयासाठी विषय निवडत हे कळले. ‘मार्मिक’ला त्या काळात नाशिकमध्येही प्रचंड मागणी होती. शिवसैनिकांसह वाचकांच्याही त्यावर अक्षरश: उडय़ा पडायच्या. भल्या सकाळपासून मार्मिक घेण्यासाठी स्टॉलवर गर्दी जमत असे, असेही तांबे यांनी सांगितले.
.. अन् दृष्टिपथास आले सावरकर स्मारकाचे नूतनीकरण
स्वातंत्र्यवीर सावरकर व त्यांच्या विचारांबद्दल बाळासाहेबांना विशेष आकर्षण होते. भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मगाव. त्यामुळे या गावाबद्दल त्यांना अधिक ममत्व. त्या काळात जाहीर सभेसाठी बाळासाहेब भगूरला आले असता सावरकर यांच्या घराची दुर्दशा पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम या घराचे स्मारकात रूपांतर करण्याची सूचना त्यांनी समवेत असलेल्या नेत्यांना केली होती. पुढील काळात जेव्हा युती शासन सत्तेवर आले, तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी या स्मारकाचे काम पूर्णत्वास नेऊन त्या आदेशाची अंमलबजावणी केली, असेही मामा तांबे यांनी नमूद केले.
नाशिक रोड-देवळालीमध्ये पायी प्रचार
नाशिक रोड-देवळाली नगरपालिकेच्या १९७० च्या निवडणुकीत शिवसेनेने उडी घेतली. उमेदवार उभे केले. त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेब या परिसरात स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांसमवेत पायी फिरले. या निवडणुकीच्या निकालात एकही जागा पदरात पडली नसली तरी शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळविले होते. अतिशय थोडय़ा फरकाने शिवसेनेच्या बहुतेक उमेदवारांचा पराभव झाला.
‘सापाचा बाप’
बाळासाहेबांच्या हजरजबाबीपणाची प्रचीती त्यांच्या कोणत्याही वक्तव्यावरून येत असे. नाशिक नगरपालिकेत १९७५ मध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलेल्या नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात बाळासाहेबांनी अण्णा लकडे यांचा ‘सापाचा बाप’ असा उल्लेख करून गौरव केला. नाशिकमध्ये सेनेची स्थापना करण्यापासून सेनेशी जोडले गेलेले अण्णा म्हणजे सर्पमित्र. शेकडो विषारी सापांना पकडण्याची त्यांची कामगिरी बाळासाहेबांनी क्षणार्धात आपल्या खास शैलीत सांगून टाकली. शहरात सर्पमित्र म्हणून परिचित असणाऱ्या अण्णांनी प्रदीर्घ काळ बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या छटा कॅमेराबद्ध करण्याचे कामही केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा