नागपूर हे शिवसेनेच्या दृष्टीने फारसे अनुकूल शहर कधीच राहिले नव्हते. मात्र तरीही बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराचे महत्त्व ओळखून येथील कार्यकर्त्यांशी सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबंध राखले. त्यामुळेच मुंबई-कोकणसारखा शिवसेनेचा करिष्मा इथे नसतानाही जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनातील त्यांचे स्थान नेहमी अढळ राहिले.
१९८०च्या दशकापर्यंत शिवसेनेचे खऱ्या अर्थाने नागपुरात अस्तित्व नव्हते. दिनकर चकोले, प्रभाकर चौधरी, तानाजी भोसले इत्यादी कार्यकर्त्यांनी सेनेचा झेंडा नागपुरात रोवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपुरा होता. नंतर उमेश झाडगावकर, विनय देशपांडे, प्रा. बच्चू भुते, ज्ञानेश वाकुडकर यांनी ही धुरा खांद्यावर घेतली आणि शिवसेना नागपुरात परिचित झाली. १९८७ साली विनय देशपांडे, विजय सप्तर्षी यांनी महापालिकेची निवडणूक लढवली आणि बरीच कमी मते घेतली, तरी सेना नागपुरात असल्याचे जाणवून दिले. त्यानंतर पूर्व नागपुरातून प्रवीण बरडे, शेखर सावरबांधे, मध्य नागपुरातून विनय देशपांडे, दक्षिण नागपुरातून किशोर कुमेरिया हे उमेदवार आतापर्यंत लढून पराभूत झाले आहेत.
१९९० साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत युती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा कस्तुरचंद पार्क मैदानावर झाली. भाजपचे नेते प्रमोद महाजन, प्रदेशाध्यक्ष गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेतर्फे मनोहर जोशी, छगन भुजबळ, कामगार सेनेचे नेते दत्ता साळवी, सुधीर जोशी, विदर्भाचे संपर्क प्रमुख अनंत गीते इ. नेते या सभेत उपस्थित होते. बहुधा नितीन गडकरी यांनी या सभेचे संचालन केले होते. या सभेइतकी मोठी सभा कस्तुरचंद पार्कवर नंतर झाली नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.
१९९६ साली बनवारीलाल पुरोहित हे नागपुरात भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून जिंकून आले होते. त्यांच्या प्रचारासाठी बाळासाहेबांनी यशवंत स्टेडियममध्ये सभा घेतली होती. १९९८ मध्ये त्यांनी रामटेक येथे घेतलेल्या भव्य जाहीर सभेत ‘भगवी पत्रिका’ घोषित केली. शिवसेनेचा वेगळ्या विदर्भाला नेहमीच विरोध राहिला. महाराष्ट्रातर्फे विदर्भाला सापत्न वागणूक दिल्याचा विदर्भवाद्यांचा आरोप होता. त्यावेळी, दोन वर्षांत विदर्भाचा विकास झाला नाही तर वेगळ्या विदर्भाची मागणी मान्य करीन, असे बाळसाहेबांनी याच सभेत जाहीर केले.
त्यावेळी विद्यार्थी सेनेची सूत्रे हलवणारे प्रवीण बरडे व हेमंत गडकरी हे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहेत. ‘‘तेव्हाच्या सेनेतील आज कुणीच त्या पक्षात नाही. शिवसेनेतील आजच्या अनेकांना पदे मिळाली असतील, पण आम्हाला बाळासाहेबांचे जे प्रेम आणि सहवास लाभला, तो त्यांच्यापैकी कुणाच्या वाटय़ाला आला नाही. बाळासाहेब जुन्या मातोश्रीत राहात होते तेव्हा, नंतर फाईव्ह गार्डनमध्ये गेले आणि मग आताच्या मातोश्रीवर आले त्या प्रत्येक वेळी आम्ही त्यांना भेटलो. मीनाताईंशीही भेट झाली. या स्वर्णिम भेटी होत्या. बाळासाहेब आमची आपुलकीने विचारपूस करत. ‘काय छोकऱ्या, कधी आलास नागपूरवरून’, या त्यांच्या शब्दांमधून बळ मिळे. आम्ही कुठल्याही पक्षात असलो, तरी बाळासाहेब आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही राजकारणाकडे वळलो आणि सुरुवातीचे धडे गिरवले. आजही त्या आठवणी मनात ताज्या आहेत”, अशा शब्दांत मनसेचे पूर्व विदर्भ संघटक हेमंत गडकरी यांनी कृतज्ञता
व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा