सध्याच्या सरकारने गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली आहे. मात्र त्या गॅसवर तुम्ही शिजवणार काय? कारण भाजीपाला महाग झालाय, डाळी महाग झाल्या आहेत. या सरकारने महागाई प्रचंड वाढवली आहे. हेच भाजपाचे लोक २०१२ मध्येही सिलिंडरच्या दरांविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी मला बाळासाहेब ठाकरेंनी झापलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी २०१२ चा तो किस्सा सांगितला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी जे भाषण केलं त्या भाषणात त्यांनी हा किस्सा सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब ठाकरेंनी मला झापलं..

मला आजही आठवतं आहे २०१२ हे वर्ष होतं. तेव्हा सुषमा स्वराज यांनी मला फोन केला भारत बंद करायचा आहे. मी बाळासाहेबांना विचारलं, मला म्हणाले गणपतीच्या दिवशी? छट् त्यांना सांगून टाक आम्ही गणपतीचा सण असताना भारत बंद वगैरे काही आंदोलन करत नाही. मला चांगलं आठवतं आहे कारण त्यावेळी माझी अँजिओप्लास्टी झाली होती. त्याही वेळा गणपतीच्या दिवसात यांनी भारत बंद केला होता. मी त्या आंदोलनाला गेलो आणि दुसऱ्या दिवशी माझा फोटो आला गॅस सिलिंडर हातात घेतलेला दिसत होता. त्यानंतर मला बाळासाहेबांनी मला झापलं अरे तुझी अँजिओप्लास्टी झाली आणि तू सिलिंडर कसा काय घेतलास हातात. बाळासाहेब माझ्यावर चिडलेच होते. मग मी त्यांना सांगितलं जरा थांबा माझं ऐका अहो तो थर्माकोलचा सिलिंडर होता असं मी बाळासाहेबांना सांगितलं. मग ठीक आहे असं बाळासाहेब मला म्हणाले.

२०१२ मध्ये भाजपाने गॅस सिलिंडरचं आंदोलन गणपतीच्या दिवसात केलं होतं. त्यावेळी गॅसचा दर काय होता? आज काय आहे? बघा. पाच वर्षे लुटायचं आणि दोनशे रुपयांची सूट द्यायची. हे सगळे जुमले आहेत त्यावर यांनी इमले बांधले आहेत जे आपल्याला मोडून काढायचे आहेत.

नरेंद्र मोदींना टोला

हुकूमशाही देशात आणणारा हुकूमशहा आम्हाला जन्मालाच येऊ द्यायचा नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. अनेक क्रांतिकारक फासावर गेले, अनेकांनी प्राणांची आहुती दिली त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालं. आजही घराणेशाही-घराणेशाही म्हणत जो काही एक उद्घोष चालला आहे घराणेशाहीच्या आम्ही विरोधात आहोत असं सांगत आहेत. मी तुमच्या घराण्याबद्दल विचारतच नाही कारण तुम्हाला सांगायला घराण्याचा इतिहासच नाही. जे लोक कुटुंब व्यवस्था नाकारतात त्यांनी दुसऱ्याच्या घराणेशाहीवर बोलू नये. त्यांना तो अधिकारच नाही. कुटुंब व्यवस्था, घराणं ही आमच्या हिंदूंची संस्कृती आहे. तिच्या मुळावर तुम्ही घाव घालणार आणि आमच्या घराण्यावर बोलणार? आधी कुटुंब सांभाळा मग आमच्या घराण्यावर बोला. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray was very angry with me at that time uddhav thackeray told 2012 untold story of protest against cylinder price hike scj