शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून सध्या ते गुजरातमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. तसेच शिंदे यांच्यासोबत एकूण १३ आमदार असल्याचेही म्हटले जात आहे. शिंदे नेमके कुठे आहेत हे समजत नसल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. तसेच त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत असून गरज भासल्यास सर्वजण सोबत बसून चर्चा करु असं उद्धव ठाकरे यांना सांगितले आहे, अशी माहिती थोरात यांनी दिली.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंसोबत राज्यातील कोण आमदार आहेत? ही घ्या संपूर्ण यादी

“सकाळपासून एक नवीन वातावरण निर्माण झालं. महाविकासा आघाडी म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करत आहोत. या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही आम्ही बोललो आहोत. आवश्यक असेल तेव्हा आम्ही एकत्र चर्चेला बसणार आहोत,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा >>> एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

तसेच, “माध्यमांतून जी माहिती मिळाली तीच माहिती माझ्याकडे आहे. एकनाथ शिंदे यांनी कोणता प्रस्ताव दिला याबाबत सध्यातरी आमच्याकडे कोणताही माहिती नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोत. गरज असेल तेव्हा एकत्र बसून चर्चा करु असं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे,” असेही थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा >>> मविआ सरकार अस्थिर: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा, बोलणी फिसकटली तर…

तसेच, “हायकमांडसोबत आमचा संपर्क आहे. महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील आज साडेचार पर्यंत महाराष्ट्रात येतील. तसेच कमलनाथही उद्यापर्यंत महाराष्ट्रात येतील. पुढे काय होईल ते पाहुयात. एच के पाटील यांना एकेका आमदारासोबत बोलायचे असेल तर ते बोलतील. कमलनाथ देखील आम्हाला मार्गदर्शन करतील,” अशी माहिती थोरात यांनी दिली. तसेच सध्यातरी सरकार अस्थिर नाही असेदेखील थोरात म्हणाले.