जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा मराठा आंदोलक आक्रमक झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याकडून खतपाणी घातलं जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांना विचारणा केली असता त्यांनी भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (६ सप्टेंबर) अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले, “मराठा आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. खरंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारने मागील वर्षभरात काय प्रयत्न केले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठा समाज संयमी आहे म्हणून मागील एक दीड वर्षे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, एवढा मोठा मंत्र्यांचा ताफा, पण त्यांचं मराठा समाजाकडे लक्ष नव्हतं. मराठा समाजाची सरकारकडून होणारी अवहेलना वाईट आहे. आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबाच आहे.”
मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून खतपाणी घातलं जातंय का?
मराठा आंदोलनाला राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून खतपाणी घातलं जातंय का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरातांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “खरं म्हणजे असं नाहीये. आमच्या सर्वांची एक मागणी आहे आणि ती म्हणजे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये. त्यांचं आरक्षण त्यांना राहिलं पाहिजे. त्यांचा हक्का कायम राहिला पाहिजे आणि त्याशिवाय ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा नेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. आमचे नेते हेच आधीपासून बोलत आले आहेत.”
हेही वाचा : “ज्या दिवशी संध्याकाळी हा लाठीमार सुरू झाला त्यावेळी मुंबईत…”; संजय राऊतांचं मोठं विधान
“भाजपा मराठा आरक्षणाच्या मागणीची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतंय”
“म्हणूनच आता काही नेते मराठा आरक्षणावर बोलत असतील, तर त्याला खतपाणी घातलं म्हणणं योग्य नाही. हे दुसरी वाट शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा या मागणीची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहे इतकाच या चर्चेला अर्थ आहे,” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी मराठा आंदोलनाला खतपाणी खालण्याचा आरोप फेटाळला.