आगामी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय. महायुतीत जास्तीत जास्त जागा विळाव्यात यासाठी भाजपाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. रत्नागिरी मतदारसंघही आमच्याकडेच राहावा यासाठीही भाजपाची चाचपणी चालू आहे. मात्र काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, अशी भूमिका शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी घेतलीय. यावरच आता काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वाचं विधान केलंय. ते २ मार्च रोजी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते.
“हा तर फक्त ट्रेलर”
यावेळी बोलताना त्यांनी आगामी काळात महायुतीतील संघर्ष वाढत जाणार आहे, असा दावा केला. “महायुतीतील तिन्ही पक्षांतील संघर्ष आता दिसू लागला आहे. या संघर्षाला सुरुवात झालीय. हे फक्त ट्रेलर आहे. जशी-जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं खरा सिनेमा पाहायला मिळणार आहे,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
रामदास कदम काय म्हणाले होते?
रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं होतं. काहीही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असं कदम म्हणाले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही टीका केली होती. “सर्वांना संपवून भाजपालाच जिवंत राहायचं आहे. परंतु, असं होणार नाही. आपण दोघे भाऊ-भाऊ, तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू… असं चालणार नाही. महायुतीत असं होता कामा नये. कुठल्याही परिस्थिती रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही. ती जागा आम्ही लढवणारच. ती आमच्या हक्काची जागा आहे. तिथे आमचा उमेदवार निवडून आला आहे,” असं रामदास कदम म्हणाले.