लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील जागांवर या दिवशी मतदान होईल. या मतदारसंघांमधील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीचा उद्या शेवटचा दिवस आहे. तसेच राज्यभरातील इतर मतदारसंघांमधील उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अद्याप काही दिवस बाकी आहेत. परंतु, महाविकास आघाडी आणि महायुतीतले नेते राज्यातील काही जागांवरील उमेदवार निश्चित करू शकलेले नाहीत. महाविकास आघाडीत काही मतदारसंघांबाबत मतभेद असल्याची चर्चा आहे. काही जागांसाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. तर काही जागांवर काँग्रेस, शिवसेना आणि ठाकरे गट अग्रही आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचा ठाकरे गट अग्रही आहे. तर भिवंडीच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट अग्रही आहे. परंतु, या दोन्ही जागांवर काँग्रेसनेदेखील दावा केला आहे. या जागांवरून मोठा तिढा निर्माण झालेला असतानाच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर थोरात म्हणाले सांगली आणि भिवंडीच्या जागेचा निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे वेळ आहे. आम्ही चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढू.
शिवसेनेच्या ठाकरे गटाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ छत्रपती शाहू महाराज दुसरे यांच्यासाठी सोडली आहे. शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर येथून लोकसभा लढणार आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला असून उद्धव ठाकरे चंद्रहार पाटलांना या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना भिवंडी मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्याच्या तयारीत आहे. परंतु, या दोन्ही जागा यापूर्वी काँग्रेसने लढवल्या होत्या. काँग्रेस या जागा सोडण्यास तयार नाही. यावर बाळासाहेब थोरात यांनी काही वेळापूर्वी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा >> “चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
बाळााहेब थोरात म्हणाले, या दोन्ही जागांबाबत निर्णय घेण्यासाठी आमच्या कडे वेळ आहे. कारण महाराष्ट्रात यावेळी पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने विचित्र निर्णय घेतला आहे. पूर्वी महाराष्ट्रात एकाच दिवशी लोकसभेची निवडणूक व्हायची. परंतु, यावेळी मोठमोठ्या राज्यांची निवडणूक एकाच टप्प्यात घेतली जाणार आहे. तर महाराष्ट्रातील निवडणूक पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे आमच्याजवळ वेळ आहे, या वेळेत आम्ही चर्चा करू आणि निर्णय घेऊ. त्या दोन्ही जागांसाठी आम्ही अग्रही आहोत ही वस्तूस्थिती आहे.