देशातील वाढत्या महागाईवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव एका रुपयाने वाढले, तर भाजपाचे लोक आंदोलन करायचे. मात्र, आता सर्व घरात लपून बसले, असे म्हणाले. तसेच जीएसटीवरूनही पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे.
हेही वाचा – “हिंदुत्वासाठी तेवढा त्याग करावा” मंत्रीमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा बंडखोर आमदारांना टोला!
काय म्हणाले बाळासाहेब थोरात?
देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव एका रुपयाने वाढले, तर भाजपाचे लोक आंदोलन करायचे. त्यांचे नेते रस्त्यावर उतरत होते. मात्र, आता इतके प्रचंड भाव वाढले असताना सर्व घरात बसून आहेत. आता त्यांना आपण जाब विचारायला पाहिजे. रोजच्या गरजेच्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात येत आहे. त्यामुळे या वस्तू महाग झाल्या आहेत. आता हॉटेलमध्ये गेल्यावर तीन जण जेवले आणि त्यावर जीएसटी लागला तर चौथी व्यक्ती म्हणून मोदी जेवले, असं समजा, असा खोचक टोला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.
हेही वाचा – अडचणींतही भारतीय संशोधकांचे कार्य कौतुकास्पद ; ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गीता नारळीकर यांचे मत
काँग्रेसकडून विरोध प्रदर्शन
‘जीएसटी’तून पूर्णपणे सूट असलेल्या लस्सी, दही, चीज आणि ताक यांसारखे दुग्धजन्य पदार्थ आणि गव्हाचे पीठ, गहू, तांदूळ व इतर धान्य, मध, पापड, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, इतर तृणधान्ये, गूळ आदी कोणतीही नाममुद्रा नसलेल्या (अन-ब्रँण्डेड) पण किंमत-वजनाचे लेबल लावून पॅकबंद स्वरूपात विकल्या जाणाऱ्या किराणा सामानावर ५ टक्के दराने कर-आकारणी सुरू झाली असल्याने या वस्तूंच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे महागाई विरोधात काँग्रेसकडून सातत्याने विरोधप्रदर्शन सुरू आहे. तसेच पेट्रोल डिझेलचे भावही प्रचंड वाढले आहेत.