Maharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी झालं. आता निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबत राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. त्यामध्ये काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, असं असलं तरी निकाल समोर आल्यानंतरच कोणाला किती जागा मिळतात? हे स्पष्ट होईल.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असतानाच मुंबईत मोठ्या घडामोडी वाढल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईतील ग्रँड हयात हॅाटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निकालानंतर किती जागा येतात? आणि त्यानंतरची पुढील रणनीती काय असेल? याबाबत चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे. एवढंच नाही तर या बैठकीनंतर जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि संजय राऊत यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्याबरोबरही चर्चा केली. त्यामुळे मुंबईत नेमकं काय घडतंय? याकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच येईल, असा दावा करत महायुतीचं सरकार सत्तेवरून घालवण्याला आम्ही पहिलं प्रधान्य देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : राज्यात कोणाचं सरकार येणार? निकालाआधीच बच्चू कडू यांचा मोठा दावा; म्हणाले, “अपक्ष अन्…”
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“आमच्या बैठकीत एकच चर्चा झाली. आम्ही २८८ जागाचा आढावा घेतला. तेव्हा आमच्या लक्षात आलं की महाविकास आघाडीचं सरकार बनेल. महाविकास आघाडीचं सरकार नक्कीच येईल, आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. असं चित्र आम्हाला स्पष्टपणे दिसत आहे. आम्हाला बहुमतापेक्षा कमी जागा येतील असं वाटत नाही. आम्हाला जुळवाजुळवीची गरज पडेल असंही वाटत नाही. त्यानंतर आमच्याबरोबर कणी आलं तर आनंदच मानतो. आता आधी निवडणूक झालेली आहे. मग निकाल समोर येईल. मग सरकार बनवताना आम्ही मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा करू. महायुतीचं सरकार सत्तेवरून घालवणं याला पहिलं प्रधान्य आम्ही देतो”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
“कोणत्याही अपक्षांबरोबर अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, नंतर ज्यांना आमच्याबरोबर यायचं ते येतील. निकालानंतर आमचा आकडा समोर आला की आम्ही राज्यपालांना त्याबाबतचं पत्र देऊ. नाना पटोले उद्या चर्चेसाठी येत आहेत. तसेच आमचे नेते रमेश चेन्निथला हे देखील येत आहेत. आज झालेल्या चर्चेचा आढावाही आम्ही दिल्लीला देणार आहोत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आमच्या संपर्कात आहेत. ते देखील सतत आढावा घेत आहेत. आमचा कोणीही आमदार फुटणार नाही. त्यामुळे ती काळजी आम्हाला नाही. आमचा आकडा चांगला आल्यानंतर आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार आणि सरकार बनवणार. आज आमच्या झालेल्या बैठकीत एक ठरलं आहे की, मतमोजणीच्यावेळी शेवटचं मत मोजून झाल्यानंतर प्रमाणपत्र घेतल्यानंतर बाहेर पडायचं. त्याआधी आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी बाहेर यायचं नाही”, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीच्या बैठकीला नाना पटोलेंची दांडी?
दरम्यान, निकालाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील उपस्थित होते. मात्र, या बैठकीला नाना पटोले उपस्थित नसल्याने उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. आज सकाळीच नाना पटोले यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्रिपदावरून खोचक टीका केली होती. त्यानंतर आजच्या बैठकीला नाना पटोलेंनी दांडी मारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.