Balasaheb Thorat On Radhakrishna Vikhe : विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु आहे. या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. राज्यभरात विविध मतदारसंघात सभा आणि मेळावे सुरु आहेत. या सभाच्या माध्यमातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच काही दिवसांपासून संगमनेर मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यात चांगलंच राजकारण तापलं आहे.
यातच आच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. आता शिर्डी विधानसभा मतदारसंघामधून मंत्री राधाकृष्ण विखे हे महायुतीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या सभेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच गणेश सहकारी साखर कारखाना आणि राहुरी कारखान्यावरून विखे पाटलांवर खोचक टीका केली. “आम्ही इकडे आलो म्हणून हे चांगले वागतात. नाहीतर तुमचा कार्यक्रम होता”, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा : काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
“तुमच्याकडच्या साखर कारखान्याने यावेळी ३ हजार २०० रुपये भाव दिला असं तुम्ही छातीठोखपणे सांगता. मात्र, १० ते २० वर्षांचा हिशेब काढा आणि किती कमी भाव दिला ते सांगा. आता पुढच्या वर्षी ना ३२००, ना ३३००, आता ५०० रुपयांचा भाव कमी देतील, हे आता गृहीत धरून चला. लोक म्हणतात आता ते (विखे) खूप चांगले वागतात. काहीजण म्हणाले की निवडणूक आहे. ते आता खूप चांगले वागतात. मात्र, आम्ही इकडे (शिर्डी विधानसभा मतदारसंघात) आलो म्हणून ते चांगले वागतात. आम्ही नसतो तर तुमचा कार्यक्रमच होता”, असं बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हटलं आहे.