पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे नाराज असल्याची चर्चां सुरु झाली आहे. २०१९ मंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेतेपदी संधी मिळाल्याची खंत संग्राम थोपटे यांनी व्यक्त केली आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. आमच्याकडून संग्राम थोपटेंवर अन्याय झाल्याचं वाटतं, असं थोरात यांनी म्हटलं आहे.
संग्राम थोपटे काय म्हणाले होते?
“२०१९ साली सरकार आल्यानंतर मंत्रीपदाची संधी मिळेल, असं वाटत होतं. पण, संधी मिळाली नाही. त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदही मिळालं नाही. विरोधी पक्षनेतेपदाबाबत पक्षश्रेष्ठी विचार करतील, असं वाटलं होतं. मात्र, पुणे जिल्हा म्हटलं की का? डावललं जातं, हे मला कळलं नाही. पक्षश्रेष्ठी डावलतात, असं नाही. परंतू, यामागे पुणे जिल्ह्यातील राजकीय शक्ती कोणाची आहे, हे सांगण्याची गरज नाही,” असं संग्राम थोपटे यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा : “आमदार होण्यासाठी दोन कारखाने, सहा कॉलेज अन्…”, इंदुरीकर महाराज यांचं विधान
“थोपटेंना विधानसभा अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्नशील होतो”
याबद्दल पुण्यात ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “संग्राम थोपटे विधानसभेतील लढाऊ सदस्य आहेत. काँग्रेसबरोबर राहून संघर्ष करण्याची थोपटे यांची परंपरा राहिली आहे. संग्राम थोपटे यांना मंत्रीपद मिळावे ही आमची अपेक्षा होती. विधानसभेचा अध्यक्ष करण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील होतो.”
हेही वाचा : ऐश्वर्या रायबद्दल केलेलं ‘ते’ वक्तव्य गावितांना भोवणार? महिला आयोगाने बजावली नोटीस; रूपाली चाकणकर म्हणाल्या…
“संग्राम थोपटे महाराष्ट्रातील महत्वाचं नेतृत्व ठरतील”
“आता विरोधी पक्षनेतेपदाची विषय आहे. आमच्याकडून संग्राम थोपटे यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं. पण, सगळ्याची परतफेड झाल्याशिवाय राहणार नाही. संग्राम थोपटे महाराष्ट्रातील महत्वाचं नेतृत्व ठरतील,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.