अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवारांना समर्थन देणाऱ्या आमदारांचा आकडा अद्याप समोर आला नाही. पण, या फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाची पुन्हा उभारणी करू शकतील का? असा प्रश्न उभा राहिला आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे. ते ‘मुंबई तक’च्या चावडी या कार्यक्रमात बोलत होते.
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची पुर्नंबांधणी करु शकतील असं वाटतं का? असा प्रश्न विचारल्यावर बाळासाहेब थोरात म्हणाले, “शरद पवार राज्यात फिरून लोकसभा आणि विधानसभेला चांगला निकाल आणतील. शरद पवार फक्त नमस्कार करत फिरले, तरी राष्ट्रवादी पक्ष उभा राहिल. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार निवडून येतील.”
हेही वाचा : “…तेव्हाच सिग्नल मिळाला होता”, अजित पवारांच्या बंडावर थोरातांचं मोठं विधान
शरद पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन राजकारण करावे, असं वाटतं का? या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं की, “शरद पवार यांनी स्वतंत्रपणे राजकारण केलं आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा विचार वेगळा नाही. फक्त दोन पक्ष आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आज ज्या पद्धतीने आम्ही चाललो आहे, त्यातूनच यश मिळवू.”
हेही वाचा : “…अन् हे एखाद्या निर्घृण हुकूमशहालाच जमू शकते”, ठाकरे गटाची पंतप्रधानांवर टीका
“काहीतरी होणार असे वाटत असताना, अचानक अजित पवार सरकारबरोबर जात उपमुख्यमंत्री झाले. काहीतरी शिजत होते, याचा वास आम्हाला येत होता. कारण, महाविकास आघाडी म्हणून आम्ही खूप चांगले होतो. वज्रमूठ सभेमुळे लोकांमध्ये उर्जा निर्माण झाली होती. त्यावेळी झालेल्या सर्वेत महाविकास आघाडीला लोकसभेच्या ३८ जागा आणि विधानसभेला १८० जागा मिळत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे वाटायचं की भाजपाला आघाडी तोडण्याशिवाय पर्याय नाही,” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.