संगमनेर : नाशिक पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने पक्षात जे घडले त्याबाबतची व्यथा पक्षश्रेष्ठींसमोर मांडली आहे. याबाबत माध्यमांत न जाता पक्षीय व्यासपीठावरच बोलून प्रश्नांची सोडवणूक करू. त्याची दखलही पक्षाने घेतली असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. आपला विचार काँग्रेसचा असून त्याच विचाराने आपण पुढे जाणार आहोत. त्या बाबतीत काहीही तडजोड केली जाणार नसल्याचेही थोरात यांनी या वेळी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 नागपूर अधिवेशनादरम्यान खांद्याला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर दीड महिन्याने आमदार थोरात यांचे  संगमनेर येथे आगमन झाले. सभेत कार्यकर्त्यांशी थोरात यांनी संवाद साधला. या वेळी व्यासपीठावर आमदार लहू कानडे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे उपस्थित होते.

 थोरात म्हणाले,की भारत जोडो यात्रेची महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावर होती. संपूर्ण देशभरात महाराष्ट्रातील यात्रा सर्वात चांगली झाली. अत्यंत चांगल्या नियोजनाची देश पातळीवर चर्चा झाली. या नियोजनामध्ये सत्यजित तांबे यांनी मोठा सहभाग घेतला. पदवीधर निवडणुकीनंतर आपण वरिष्ठांना पक्ष मजबुतीसाठी पत्र लिहिली असून तो पक्ष पातळीवर निर्णय होईल. मात्र माध्यमांनी त्याला जास्त प्रसिद्धी दिली. काँग्रेसचा विचार हाच आपला विचार असून याच विचारातून आपण पुढे जाणार आहोत. सुसंस्कृत व सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची संगमनेर तालुक्याच्या राजकारणाची परंपरा आहे. या संस्कृतीचा राज्यात सन्मान होतो. सत्यजित तांबे म्हणाले,की पदवीधर निवडणुकीच्या वेळी आमदार थोरात व तांबे परिवाराला अडचणीत आणण्याचे डाव काहींनी रचले. मात्र हे सर्व डाव जनतेने उधळून लावले आहेत.

  विखे पिता-पुत्रांवर टीका

या सभेत आमदार थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे चिरंजीव खासदार सुजय विखे यांचे नाव न घेता  टीका केली. ते म्हणाले,की आपल्या शेजारच्या मंत्र्याला आपल्याशिवाय करमतच नाही. आपल्या आठवणीशिवाय त्यांचा एकही दिवस जात नाही. राज्यात न फिरता इथेच कुठेतरी फिरत असतात. राज्याचे मंत्री आहेत की तालुक्याचे तेच कळत नाही.