संगमनेर : संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करत कारवाईची मागणी केली. मंत्री मुनगुंटीवार यांनी त्या नरभक्षक बिबट्याला तात्काळ ठार करण्यासह नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, दसरा सणाच्या पूर्वसंध्येला काल सायंकाळी संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात योगिता पानसरे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या दोन-तीन महिन्यांत देवगावसह हिवरगाव पावसा, निमगाव टेंभी, वाघापूर, खराडी या परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन चार लोक ठार झाले आहेत. त्यामुळे परिसरातील लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. पहाटे आणि सायंकाळच्या वेळेस चालणारा दूध धंदा, शेतीच्या दैनंदिन कामकाजावर देखील परिणाम झाल्याने लोक त्रासलेले आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून लोक तक्रारी सांगतात, परंतु वनविभागाचे अधिकारी नागरिकांचे फोन देखील घेत नाहीत. जिथून तक्रार येते त्या परिसरात पिंजरा लावून वन कर्मचारी गायब होतात. त्यामुळे आता दाद मागावी कोणाकडे असा प्रश्न लोकांपुढे पडला आहे. त्यातच दसरा सणाच्या पूर्वसंध्येला काल संध्याकाळी योगिता पानसरे यांनाही बिबट्याने ठार केल्याने परिसरातील लोक संतप्त झाले. त्यामुळेच आज दसरा सण असूनही या गावातील चार-पाच हजार लोकांचा जमाव रस्त्यावर उतरला.

हेही वाचा – “धर्म अनेक आहेत, पण त्या सगळ्यांच्या वरचा धर्म भारताचा प्राण आहे”, सरसंघचालक मोहन भागवतांचं संघ मुख्यालयात भाष्य!

या आंदोलनात उत्स्फूर्तपणे लोक, विशेषतः महिला आपली गाऱ्हाणी मांडत होत्या. बिबट्या महत्त्वाचा की माणसं महत्त्वाची याचा विचार आता सरकारने केला पाहिजे. सरकारला जर बिबटे महत्त्वाचे वाटत असतील तर आम्हा माणसांना मारून टाका. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यानंतर सरकार नुकसान भरपाई म्हणून पैसे देते, परंतु आम्हाला पैसे नको, तर सुरक्षा द्या अथवा माणसांसाठीच एखादे अभयारण्य निर्माण करा अशा संतप्त भावना यावेळी लोकांनी व्यक्त केल्या.

चिडलेल्या लोकांच्या आंदोलनाची माहिती मिळताच सध्या तालुक्यातच असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे तात्काळ आंदोलन स्थळी गेले. लोकांच्या तीव्र भावना ऐकून घेतल्यानंतर त्यांनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन केला. दोघांच्यातील हे संभाषण स्पीकरवरून सर्व लोकांना ऐकविण्यात आले. वनमंत्र्यांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आज दसरा सण असूनही चार-पाच हजार लोक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. तो बिबट्या नरभक्षक झाला असून त्याला गोळ्या घातल्या पाहिजेत. अजूनही किमान पंधरा-वीस बिबटे या परिसरात आहेत, त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे. वनविभागाचे लोक पिंजरे लावतात परंतु त्यात बिबटे अडकत नाहीत. वनखात्याचे अधिकारी जनतेचे फोन घेत नाहीत, मग लोकांनी तक्रार कोणाकडे करायची ? असा सवाल आमदार थोरात यांनी मुनगंटीवार यांना केला. याशिवाय लोकांच्या तक्रारी ऐकून न घेणाऱ्या वनविभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा – Manoj Jarange Patil : “आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार”, मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्यातून मोठा इशारा

मंत्री मुनगुंटीवार जनतेशी संवाद साधताना म्हणाले की, “आज सणाची सुट्टी असली तरी त्या नरभक्षक बिबट्याला तात्काळ ठार मारण्याचे आदेश आपण देत आहोत. त्या परिसरात असलेले उर्वरित बिबटे पकडण्यासाठी जनतेने सहकार्य करावे आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लगोलग तेथे जाऊन परिसरातील सर्व बिबट्यांना पकडण्याची कार्यवाही करावी असेही आदेश आपण देत आहोत.” वनमंत्र्यांच्या या आदेशानंतरही लोकभावना तीव्र होत्या. मात्र थोरात यांनी समजूत घातल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.