कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर सडकून टीका केली. “भारतीय जनता पार्टीने कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, बंटी पाटील सर्वांना पुरून उरले,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं. ते कोल्हापूरमधील विजयानंतर आज (१६ एप्रिल) मुंबईत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब थोरात म्हणाले, “कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या निवडणुकीतील विजयासाठी मनापासून अभिनंदन. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला, मात्र बंटी पाटील सर्वांना पुरून उरले. आजच्या विजयाने हे अधोरेखित झाले.”

“कोल्हापुरात धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता मविआचा विजय”

“स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

“भाजपाकडून जयश्री जाधव यांचा अपमान करण्याचे पातक”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “भारतीय जनता पार्टीने कोल्हापूरच्या मतदारांवर ही निवडणूक लादली होती. जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहात महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपाने करायला हवे होते. मात्र, तसे न करता वेगवेगळे आरोप करण्यात आले. ताराराणीच्या भूमीत महिला असलेल्या जयश्री जाधव यांचा अपमान करण्याचे पातक भाजपने केले. मात्र, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आजच्या निकालातून भारतीय जनता पार्टीच्या चुकीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे.”

“मविआच्या एकजुटीमुळेच हा विजय”

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना महाविकास आघाडीच्या सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवारही या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. त्यांच्या एकजुटीमुळेच हा विजय साकारला,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

हेही वाचा : कोल्हापुरातील निकालांनंतर हिमालयात जाणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात, “मी असं म्हटलं होतं की…!”

“काँग्रेस नेते तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील कोल्हापूरचे संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत आणि मंत्री हसन मुश्रीफ सतत सोबत राहिले काँग्रेसच्या वतीने सर्वांचे आभार मानतो,” अशी भावनाही थोरात यांनी व्यक्त केली.

“कोल्हापूरचा विचार समतेचा, प्रबोधनाचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महाराणी ताराबाईंचा”

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, “चंद्रकांत जाधव हे सातत्याने कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कार्यरत होते. त्यांच्या अकस्मित निधनामुळे झालेली पोटनिवडणूक काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर लढवली, पण भाजपाने या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या जनतेने भाजपाचा धर्मांध विचार नाकारून कोल्हापूरचा विचार हा समतेचा, प्रबोधनाचा आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे आहे, हे दाखवून दिले आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat praise satej patil after victory in kolhapur bypoll pbs