राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान, शरद पवारांच्या या घोषणेनंतर आता विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी शरद पवारांनी सुप्रिया सुळेंच्या फोनवरून साधला संवाद, “माझा आग्रह..”

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

“शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, देशात आज लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी मोठा लढा सुरू आहे. अशावेळी शरद पवार यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून बाजुला होऊन चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते ‘सिल्वर ओक’वर दाखल, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर….

बाळासाहेब थोरातांबरोबरच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे. विशेषत: केंद्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाविरोधात आघाडी उभी करत असताना शरद पवारांची निवृत्ती घेणं, ही न पटणारी बाब आहे. त्यांनी असं करायला नको होतं, अशीच आमची भावना आहे. पण हा निर्णय त्यांचा अंतर्गत निर्णय असून काँग्रेस पक्ष त्यावर लक्ष ठेवून आहे.”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शरद पवारांच्या नावाने घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी मारली टपली; म्हणाले, “आरे…!”

दरम्यान, आज शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ते म्हणाले, मी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून गेली २४ वर्षे या अध्यक्ष म्हणून काम पाहतो आहे. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा प्रवास ६३ वर्षांपासून अवरित सुरू आहे. त्यापैकी ५६ वर्षे मी कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सदस्य किंवा मंत्री म्हणून सातत्याने काम करत आहे. आता राज्यसभेच्या सदस्यत्वाची ३ वर्षे शिल्लक आहेत. या काळात राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नांमध्ये अधिकाधीक लक्ष घालण्याचा माझा प्रयत्न असेल, १ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक आहे, त्यामुळे अधिक मोह न करता मी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat reaction on sharad pawar resign as ncp party president spb
Show comments