देशात हुकूमशाही व एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजपा सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता व काँग्रेसजन हे सोनिया गांधींच्या पाठीशी आहेत, असं मत विधिमंडळ पक्षनेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने आज सोनिया गांधी आणि राहुल गांधींना समन्स पाठवले असून सोनिया यांना ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलंय. शिर्डी येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> विश्लेषण: २००० कोटींची संपत्ती ५० लाखांमध्ये… ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण नेमकं आहे तरी काय? सोनिया गांधी, राहुल गांधींशी संबंध कसा?

“केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे. देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी व राहुल गांधी यांना दिलेल्या ईडीच्या नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. भाजपा सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही,” असं म्हणत थोरात यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिलीय.

“या प्रकरणी संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीर उभी असून भाजपाच्या या चुकीच्या दडपशाहीमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड रोष व असंतोष निर्माण झालाय,” असंही थोरात म्हणाले. यावेळी थोरातांसमवेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. सचिन सावंत, आशिष दुवा आदी उपस्थित होते.

तर या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, “उदयपूर संकल्प शिबिरातील अर्थकारणाच्या गटातून मोदी सरकारच्या सध्याच्या धोरणांवर तीव्र विरोध करण्यात आला आहे. सार्वजनिक कंपन्यांच्या काही भांडवलदारांना कवडीमोल किंमतीत विक्री, राज्यांच्या अधिकारावर गदा, या मुद्द्यांबरोबर भविष्यातील आधुनिक तंत्रज्ञान चे मनुष्यबळ तयार करावे लागणार आहेत. १९९० चे आर्थिक बदलानंतर टेलिकॉम व पेट्रोल या क्षेत्रातील सत्ता काही उद्योजकांच्या हाती गेली आहे.

पुढे बोलताना चव्हाण यांनी महागाईमुळे देशात महामंदी येईल अशी भीतीही व्यक्त केली असून राज्य केंद्राकडून राज्याला कायम सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.