बाळासाहेब ठाकरे वाघ होते, त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र बाबरी मशिद पडली तेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे कुठे होते? असा खोचक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. राजमाता जिजाऊ चौकाचा लोकार्पण सोहळा मुंबईत पार पडला. त्यावेळी केलेल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एक काळ असा होता प्रभू श्रीरामांचं मंदिर ध्वस्त होऊन बाबरीचा ढाचा तयार झाला होता. अनेक हिंदू राजे, रजवाडे हे मुघलांचे मनसदरबार म्हणून काम करत होते. त्यावेळी आपण गुलामगिरीत गेलो होतो. त्या काळात आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्य ही संकल्पना समजावून सांगितली. शिवबा तुला अन्यायाविरोधात उभं रहावं लागेल, रयतेला गुलामगिरीतून सोडवावं लागेल हा मूलमंत्र आई जिजाऊंनी शिवबांना दिला असं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.
हे पण वाचा- “सीता मातेने शाप मागे घेतला त्यामुळेच…”, अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रांचं वक्तव्य चर्चेत
बाबरी ढाचा पाडला त्यानंतर राम मंदिर होतं आहे
बाबरी ढाचा १९९२ मध्ये पाडण्यात आला. त्यानंतर प्रत्येकला वाटत होतं की राम मंदिर झालं पाहिजे. २२ जानेवारीला राम मंदिर होतं आहे. आपलं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. मला खरं म्हणजे जे लोक आपल्याला प्रश्न विचारायचे, आपल्याबरोबर असणारे लोक सभेतून विचारायचे मंदिर वहीं बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे.. त्यांच्या छातीवर चढून आपण तारीख सांगितली. २२ जानेवारी २०२४ या दिवशी राम मंदिर होतं आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वाघ होते. ते आंदोलनाच्या मागे भक्कमपणे उभे होते. पण उद्धव ठाकरे आणि तुमचे चेलेचपाटे त्या आंदोलनात कुठे होतात? या आंदोलनाशी तुमचा काहीही संबंध नाही. तुम्ही अयोध्येला आला नाहीत, कारसेवेला आला नाहीत. यांचं हिंदुत्व भाषणापुरतं आहे. भाषणापलिकडे यांचं हिंदुत्व नाही. ज्या लाखो कारसेवकांनी श्रम केले, ज्यांनी बलिदान दिलं त्यातून राम मंदिर उभं होतं आहे. नव्या भारताची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. अशा भारताची निर्मिती होते आहे जो जगातलं उत्तम राष्ट्र म्हणून उभा राहणार आहे.
मुंबईतलं परिवर्तन आपल्या कार्याकाळातलं
आज मुंबईतलं जे परिवर्तन आहे ते आपल्या कार्यकाळात झालेलं परिवर्तन आहे. मोदींच्या आशीर्वादामुळे झालेलं परिवर्तन आहे. याचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे अटल सेतू. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या सेतूचं उद्घाटन केलं जातं आहे. आता यांचा उघडा पडला आहे. वर्षानुवर्षे यांचं राजकारण काय होतं? कुठलाही प्रकल्प करायचा नाही आणि प्रकल्प होणार असेल तर विरोध करायचा. मागे वळून पाहिल्यानंतर एक तरी प्रकल्प तुमच्या नावाने दिसेल का? हा माझा त्यांना (उद्धव ठाकरे) सवाल आहे. ज्या वेळी मुंबईकरांच्या हिताचे निर्णय घ्यायची वेळ होती त्यावेळी हे कुणाच्या तरी हिताचा विचार करुन दबावाखाली होते असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.