Balawant Wankhede Challenged to Navneet Rana : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला नाही. मात्र आता ते उगाच आरोप करीत सुटले आहेत. त्यांना जर इव्हीएमवर शंका असेल, तर अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे यांनी आधी राजीनामा द्यावा. त्यासोबतच बडनेराचे आमदार रवी राणा हे देखील राजीनामा देतील”, असं आव्हान भाजपाच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला अमरावतीचे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी प्रतिआव्हान दिले आहे.
महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात एल्गार पुकारला आहे. ईव्हीएम घोटाळ्यामुळे राज्यात सरसकट भाजपाला सत्ता स्थापन करण्यास यश मिळाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जातोय. दरम्यान, यावरून नवनीत राणा यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी ठरलेल्या बळवंत वानखेडे यांना आव्हान दिलं. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायच्या असतील तर आधी राजीनामा द्या, मग रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील, असं नवनीत राणा म्हणाल्या. त्यांचे हे आव्हान खासदार बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलं असून त्यांनी नवनीत राणा यांना प्रतिआव्हानही दिलं आहे.
हेही वाचा >> अमरावती : नवनीत राणा म्हणतात, “…तर रवी राणा देखील राजीनामा देतील”
u
अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखेडे म्हणाले, “भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या नवनीत राणा यांनी आव्हान दिलं आहे की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेटपेपरवर निवडणूक लढवाव्यात. निवडणूक आयोगाकडून त्यांनी मला लेखी पत्र द्यावं. येणारी लोकसभेची पोटनिवडणूक बॅलेटपेपरवर होईल, असं या लेखी पत्रात असावं. नवनीत राणा म्हणाल्या त्याप्रमाणे मी कधीही राजीनामा देण्यास तयार आहे. फक्त एकच अट आहे की निवडणूक आयोगाकडू बॅलेटपेपरवर निवडणुका घेऊ असं पत्र त्यांनी द्यावं.”
नवनीत राणांनी काय टीका केली होती?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्षाकडून मतदान यंत्राविषयी संशय व्यक्त केला जात असून या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. त्यावर भाष्य करताना नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वकाही बरोबर होते. त्यावेळी लोकशाही जिवंत होती आणि आता विरोधात निकाल आला, म्हणून लोकशाही धोक्यात आली, हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे, असे नवनीत राणा म्हणाल्या.
हेही वाचा : तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील
जर अमेरिकेतील मतमोजणी अडीच दिवस चालत असेल तर आपल्याकडे काय अडचण आहे. लोकशाहीत मतदान प्रक्रिया ही पारदर्शी असली पाहिजे. मी टाकलेले मत कुठे गेले आहे, हे मला कळलेच पाहिजे. त्यासाठीच आम्ही आता राष्ट्रपतींना विनंती केली आहे. पाच वाजता ५२ टक्के मतदान होते. नंतर ते ६५ ते ६८ टक्के झाले. ही आकडेवारी कशी वाढली? यावर निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही, असा आरोप विरोधकांनी केला आहे.