भारतीय रेल्वेच्या ‘सर्वाधिक सुंदर’ रेल्वे स्थानकांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील चंद्रपूर व बल्लारशहा या स्थानकांनी प्रथम पारितोषिक पटकावले असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी दिली. रेल्वेच्या अंतर्गत स्थानक सौंदर्यीकरण स्पर्धेतून दोन्ही स्थानकांची या बहुमानासाठी निवड करण्यात आली.
पूर्व मध्य रेल्वेचे मधुबनी आणि दक्षिण रेल्वेचे मदुराई या स्थानकांनी दुसरे पारितोषिक मिळवले आहे. स्थानिक मिथिला कलाकारांनी अलीकडेच सौंदर्यीकरणासाठी पारंपरिक कलाविष्कार वापरून मधुबनी स्थानकाचा कायापालट केला होता.
भारतीय रेल्वेच्या ११ झोन्समधील ६२ प्रवेशिकांमधून मध्य रेल्वेच्या चंद्रपूर व बल्लारशहा ही स्थानके अव्वल ठरली असून, भारतीय रेल्वेची सर्वाधिक सुंदर स्थानकांचे प्रथम पारितोषिक त्यांनी संयुक्तरित्या पटकावले असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. प्रथम पारितोषिक रोख १० लाख रुपयांचे, तर दुसरे पारितोषिक ५ लाख रुपयांचे आहे.
पश्चिम रेल्वेचे गांधीधाम (गुजरात) आणि पश्चिम मध्य रेल्वेचे कोटा (राजस्थान) या स्थानकांनी संयुक्तरित्या तिसरा क्रमांक मिळवत ३ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले.