कराड : केंद्र सरकारने साखरेला ३ हजार ३०० रुपये हमीभाव दिलेला असताना आज खुल्या बाजारात साखरेला ४ हजार १०० रुपयांचा दर मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वी ३ हजार २०० रुपयांचा दर होता आणि कारखान्यांनी ३ हजार २०० रुपयांचे पहिले देयक शेतकऱ्यांना दिले होते. अजूनही साखरेचे दर वाढतच राहणार असल्याने कारखान्यांनी उसाचे दुसरे देयक प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे देण्याची आग्रही मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने केली आहे.

केंद्र सरकारने ऊस उत्पादकांना दिलासा देत साखरेला प्रतिक्विटंल ३ हजार ३०० रुपये हमीभाव दिला आहे. मात्र, प्रत्यक्षात साखरेला प्रतिक्विंटल ४ हजार १०० रुपये दर मिळत असून, किरकोळ बाजारात साखरेला ४५ रुपये प्रतिकिलो म्हणजे प्रतिक्विंटल ४ हजार ५०० दर मिळत आहे. ३ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल दर असताना कारखान्यांनी शेतकऱ्यांना प्रतिटन ३ हजार २०० रुपये दिले आहेत. मात्र, आता ९०० रुपये जादा दर मिळत असून, प्रतिक्विंटल ४ हजार १०० रुपये दर आहे.

दिवाळीपर्यंत साखरेचा दर ५० रुपयांपर्यंत जाण्याची चिन्हे आहेत. साखरेच्या दराबाबत कारखान्यांना कोणताही धोका नाही. त्यामुळे कारखानदारांनी वाढीव साखरदराचा लाभ शेतकऱ्यांना दिलाच पाहिजे, तसेच प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे दुसरे देयक शेतकऱ्यांना दिलेच पाहिजे, असे बळीराजाचे अध्यक्ष पंजाबराव पाटील यांचे म्हणणे आहे. या न्याय्य मागणीसाठी वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे पंजाबरावांनी दिला आहे.सन १९६४ मध्ये उसाला प्रतिटन २०० रुपये दर असताना सोन्याचा तोळ्याचा दरही तोच होता. आज सोन्याच्या दराचा विचार करता ऊस उत्पादकांची कशी लूट केली जाते हे स्पष्टपणे दिसत असल्याचे पंजाबराव म्हणाले.