दोन महिन्यांपासून अधिकारी, कामगारांना पगारही नाही
थापर उद्योग समूहाचा विदर्भातील सर्वात मोठय़ा बल्लारपूर पेपर मिलचे उत्पादन २२ दिवसांपासून ठप्प झाले आहे. या उद्योगातील सातही मशिन्स बंद करण्यात आल्याने आणि दोन महिन्यांपासून पगार नसल्यामुळे अधिकारी व कामगारांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. कच्च्या मालाअभावी मशिन्स बंद असल्याचे सांगण्यात येत असले तरी जे.के. उद्योग समूहासोबत विक्रीच्या वाटाघाटीतील तांत्रिक अडचणींमुळे हा उद्योग बंद असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या उद्योग समूहाच्या महाराष्ट्रातील बल्लारपूर, आष्टी व पुण्याजवळील पेपर मिलमधीलही उत्पादनही बंद आहे, तसेच कागजनगर व आसाममधील पेपर मिलही बंदच आहे.
विदर्भात थापर उद्योग समूहाचा हा कारखाना येथून १५ किलोमीटरवरीलस बल्लारपूर येथे, तर याच उद्योग समूहाचे दुसरे युनिट जवळच गडचिरोली जिल्ह्य़ातील आष्टी येथे आहे. बल्लारपूर कारखाना गेल्या ६० वर्षांंपासून सुरू आहे. विशेष म्हणजे, बल्लारपूर या दीड लाख लोकसंख्येच्या शहराचे संपूर्ण अर्थकारण या एका उद्योगावर आहे. पेपर मिल बंद पडली, तर बल्लारपूर शहर जेथे आहे तेथेच थांबेल, त्यामुळे या शहरासाठी हा उद्योग जीवनवाहिनी म्हणून काम करतो. मात्र, गेल्या २२ ऑगस्टपासून या उद्योगात पेपर उत्पादन करणाऱ्या सातही मशिन्स पूर्णत: बंद आहेत, तसेच अधिकारी व कर्मचारी सकाळी ८ वाजता येतात आणि सायंकाळी ६ वाजता जातात. त्यांना दोन महिन्यांपासून पगारही मिळालेला नसल्याने ते कमालीची अस्वस्थता आहेत. आज विदर्भात सर्वाधिक लोकांना रोजगार देणारा उद्योग म्हणून या मिलकडे बघितले जाते. या उद्योगात सध्या १२०० नियमित, १६० रोजंदारी आणि २८०० कंत्राटी, असे एकूण ४ हजार १६० कामगार आहेत, तसेच या उद्योगांवर अनेकांचे व्यवसायही आहेत, त्यामुळे या उद्योग बंदीचा किमान १० हजार लोकांना याचा फटका बसलेला आहे. या उद्योगातील कामगारांच्या ए, बी व सी अशा तीन पाळ्यांमध्ये काम चालायचे. मात्र, त्याही बंद करण्यात आलेल्या आहेत. याथी कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने कुठलीही सूचना न दिल्याने हा उद्योग सुरू राहील की बंदच होईल, या चिंतेने अस्वस्थता अधिकच वाढत आहेत. पेपर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल या उद्योग समूहाला मिळणे कठीण झालेले आहे, ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे त्यांना विदेशातून कच्चा माल आयात करावा लागत होते. मात्र, ते आर्थिकदृष्टय़ा परवडत नसल्याने उद्योग बंदीशिवाय कंपनीकडे पर्याय नाही, त्यामुळेच पेपर मिल बंद केल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठय़ा जे.के. उद्योग समूहाने थापर समूहाकडून ही पेपर मिल विकत घेतल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात एका अर्थविषयक इंग्रजी वर्तमानपत्रात थापर उद्योग समूहाकडून जे.के. उद्योग समूहाने पेपर मिल खरेदी केल्याचे वृत्त प्रकाशित झालेले आहेत. मात्र, यातील आर्थिक व्यवहारात काही तांत्रिक अटी निर्माण झाल्याने सध्या दोन कंपन्यांमधील वाटाघाटींमुळे मिल बंद केल्याचे सांगितले जात आहे. उत्पादन ठप्प असल्यामुळे अनेक शंका कुशंका घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी कधीही हा उद्योग किंवा आष्टीचा कारखाना इतके दिवसांसाठी बंद झालेला नव्हता. यापूर्वी केवळ कामगारांच्या संपासाठीच तो बंद ठेवण्यात आलेला होता. मात्र, यावेळी प्रथमच स्वत: व्यवस्थापनानेच उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने उलटसुलट चर्चाना पेव फुटले आहे. कुठल्याही परिस्थितीत उद्योग बंद होणार नाही, असेही सांगितले जात असल्याने उत्पादन बंद करण्यामागील उद्देश काय, याचे रहस्य गुलदस्त्यात आहे.