भाऊ-बहिणीच्या स्नेहाचा धागा घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण काही दिवसांवर आला असताना राखीच्या या धाग्याला पर्यावरणपूरकतेची किनार लाभली आहे. वसईतील बाजारात आदिवासी महिलांनी बनवलेल्या बांबूच्या राख्या सध्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या कामी विवेक राष्ट्र समिती या संस्थेने पुढाकार घेतला असून त्यातून या महिलांना घरच्या घरी रोजगारही उपलब्ध झाला आहे.

रक्षाबंधन या सणाला अवघे काही दिवस उरले असल्याने पालघर जिल्ह्य़ातील आदिवासी महिलांनी बांबू व इतर नैसर्गिक साहित्याचा वापर करून आकर्षक अशा पर्यावरणपूरक राख्या तयार करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील भालीवली या भागात असलेल्या विवेक राष्ट्र समितीच्यावतीने या भागातील आदिवासी महिलांना स्वयं रोजगारासाठी मार्ग उपलब्ध व्हावा यासाठी बांबूपासून राख्या व इतर वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यातूनच सध्या रक्षाबंधन हा सण जवळ येत असल्याने पर्यावरणपूरक रंगीबेरंगी राख्या तयार करण्याची लगबग सुरू  झाली आहे.

या महिलांनी आपल्या कला-कौशल्यातून पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करण्यासाठी बांबू, नैसर्गिक रंग, विविध रंगाचे रेशम धागे, लाकडी मनी या साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यामुळे राख्या अधिक आकर्षक असल्याने याची मागणी हळूहळू वाढू लागली आहे.

या भागातील महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळावा व त्यांच्या कलेला प्रेरणा मिळावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमातून कंदील, शोभेच्या वस्तू व इतर येणाऱ्या सणानुसार पर्यावरणपूरक वस्तू तयार करण्यात येत असतात. यातून या महिलांना चांगला रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येसुद्धा नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे.

या महिलांनी आतापर्यंत पंधरा हजारांहून अधिक पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या असून अजून राख्या तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशिक्षक प्रगती भोईर यांनी दिली आहे. तयार करण्यात आलेल्या राख्यांची किंमतसुद्धा सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशी ठेवण्यात आली आहे. २० ते ४० रुपये अशी या राख्यांची किंमत ठेवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे मागणी असेल त्याप्रमाणे या राख्या तयार करून दिल्या जाणार आहेत.